मेलबर्न : टी-20 वर्ल्डकपला उद्यापासून सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानशी रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात हाय व्होल्टेज सामना पहायला मिळणार आहे. गेल्यावर्षीच्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढणार का, हा प्रश्न आता भारतीयांच्या मनात आहे. अशातच वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी सर्व टीम्सच्या कर्णधारांची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान फॅन्समध्ये हे जाणून घेण्याचीही उत्सुकता असते की, सामन्यादरम्यान किंवा भेटल्यानंतर खेळाडू आपापसात काय बोलतात? दोन्ही टीम्सचे खेळाडू सामना, प्रेशर किंवा रणनीती याबद्दल बोलतात का? की खेळाडू एकमेकांशी मजामस्ती करतात. चाहत्यांच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर दोन्ही टीम्सच्या कर्णधाराने दिलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने यावेळी खुलासा केला की, जेव्हा आम्ही भारतीय खेळाडू किंवा कर्णधार रोहित शर्माला भेटतो तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो.
तर यावेळी रोहित म्हणातो की, आम्ही सामन्याबद्दल काहीच बोलत नाही. एकमेकांचं चौकशी करून मजामस्ती करतो.
बाबरने पुढे म्हणतो, "रोहित शर्मा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मी त्याच्याकडून अधिकाधिक अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. रोहित माझ्यापेक्षा जास्त खेळला आहे. मी जितकं जास्त शिकू शकेन तितकं माझ्यासाठी चांगलं आहे."
तर रोहितच्या म्हणण्याप्रमाणे, "जेव्हा पण आम्ही भेटतो तेव्हा आमच्यावर कोणतंही दडपण नसतं. आम्ही आशिया कपमध्ये भेटलो, आता भेटलो आणि जेव्हाही भेटतो तेव्हा घराची आणि कुटुंबाची चौकशी करतो. याशिवाय आयुष्य कसं सुरुये, कोणती नवीन कार घेतली किंवा घेणार आहात याचबद्दल चर्चा करतो."