रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला रांचीमध्ये सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण टॉसच्यावेळी आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली. विराट कोहलीबरोबर दक्षिण आफ्रिकेचे दोन कर्णधार मैदानात आले. या मॅचआधी आपण प्रॉक्सी कर्णधार घेऊन मैदानात येऊ शकतो, असे संकेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डुप्लेसिसने दिले होते.
फॅफ डुप्लेसिसने मागचे ६ टॉस जिंकले नाहीत, त्यामुळे नशीब बदलण्यासाठी डुप्लेसिस टेंबा बऊमाला प्रॉक्सी कर्णधार म्हणून घेऊन आला. विराट कोहलीने नाणेफेक केली पण तरीही बऊमाला टॉस जिंकता आला नाही.
Virat Kohli called it a no-brainer to bat first at the Toss #TeamIndia #INDvSA @Paytm pic.twitter.com/3V4fKvcVWr
— BCCI (@BCCI) October 19, 2019
फॅफ डुप्लेसिसने आशिया खंडात लागोपाठ ९ टॉस हरण्याचा नकोसा विक्रम केला आहे. याआधीही मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये डुप्लेसिस जे.पी.ड्युमिनीला टॉससाठी घेऊन आला होता. त्या मॅचमध्ये ड्युमिनी अंतिम ११ खेळाडूंमध्येही नव्हता.
तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने टीममध्ये एक बदल केला. कुलदीप यादवच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे शाहबाज नदीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या टीममध्ये तब्बल ५ बदल केले आहेत. वर्नन फिलंडर, थिऊनिस डे ब्रुयन, एडन मार्करम, केशव महाराज आणि मुथुस्वामी यांना बाहेर ठेवण्यात आलंय. तर लुंगी एनगिडी, झुब्यार हामझा, हेन्रीच क्लासीन, जॉर्ज लिंडे आणि डेन पिडिट यांना संधी देण्यात आली आहे.