Shocking News For Indian Fans India vs Zimbabwe 1st T20I: टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा विश्वविजेता पदानंतरच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये झिम्बाब्वेसारख्या लिंबू-टिंबू संघाने भारताला पराभावाचा धक्का दिला आहे. झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात झालेल्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भारताला 13 धावांनी पराभव झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय संघ 20 ओव्हरच्या आत केवळ 102 धावांवर तंबूत परतला झाला. भारताचे प्रमुख खेळाडू या दौऱ्यामध्ये नसून अनेक नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व भारताचा सलामीवीर शुभमन गिल करत आहे.
शुभमनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने उत्तम सुरुवात करत दुसऱ्याच ओव्हरमध्ये झिम्बाब्वेच्या सलामीवीराला माघारी पाठवलं. झिम्बाब्वेच्या संघाच्या 20 ओव्हरमध्ये केवळ 115 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांना झिम्बाब्वेच्या 9 खेळाडूंना बाद करण्यात यश आलं. झिम्बाब्वेचा विकेटकीपर क्लीव्ह मदांदेने सर्वाधिक म्हणजेच 25 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. मदांदे नाबाद राहिला. ब्रायन ब्रेनेट (22), वेस्ली मधेवरे (21) आणि डायन मायर्स (23) या तिघांनाही मदांदेला उत्तम साथ दिली.
भारताकडून फिरकीपटू रवी बिश्नोईने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोईने 2 निर्धाव षटकं टाकली. त्याने 13 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने दोन गडी बाद केले. तसेच मुकेश कुमार आणि आवेश खानने प्रत्येकी एक गडी बाद केला.
सहाहून कमी सरासरीने धावा हव्या असताना भारताला 116 धावांचं आव्हानही पेलवलं नाही. संपूर्ण भारतीय संघ कसाबसा तिहेरी धावसंख्या गाठू शकला. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून तुफानी फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्माला त्याच्या पहिल्या अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये भोपळाही फोडता आला नाही. सामन्यातील चौथ्या बॉलवर अभिषेक बाद झाला. त्यानंतर चौथ्या ओव्हरला ऋतुराज गायकवाड 7 धावा करुन तंबूत परतला. पाचव्या ओव्हरला रियान पराग 2 धावा करुन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंहला भोपळाही फोडता आला नाही दुसऱ्याच बॉलवर तो झेलबाद झाला. दहाव्या ओव्हरला संघाची धावसंख्या 43 वर असताना जुरेलच्या रुपात पाचवी विकेट पडली.
नक्की पाहा >> विराटच्या मोबाईल Wallpaper वर अनुष्का किंवा मुलांना नाही तर 'या' व्यक्तीला स्थान; Airport वरील Photos Viral
भारतीय संघाच्या धावसंख्येत चारही भर घालून 47 वर धावसंख्या असताना कर्णधार शुभमन गिल 31 धावा करुन बाद झाला. त्यानंतर 13 व्या ओव्हरला रवी बिश्नोई बाद झाला. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने 34 बॉलमध्ये 27 धावा केल्या. 84 धावांवर असताना आवेश खानच्या रुपात भारताची आठवी विकेट पडली. भारताची धावसंख्या 86 वर असताना मुकेश कुमार 17 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात भारताची दहावी विकेट 20 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर पडली.