हार्दिक पांड्या, के.एल.राहुलला बीसीसीआयने झापलं

बीसीसीआयनेही या दोन्ही खेळाडूंना दणका दिला आहे. 

Updated: Jan 9, 2019, 03:35 PM IST
हार्दिक पांड्या, के.एल.राहुलला बीसीसीआयने झापलं  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडून हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांना निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात सहभागी होणं चांगलंच महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे. महिलांविषयीच्या वक्यव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, आता बीसीसीआयनेही या दोन्ही खेळाडूंना दणका दिला आहे. 

बुधवारी बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, आता त्यांच्यावर कारवाईची होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काळात 'कॉफी विथ करण'सारख्या कोणत्याही कार्यक्रमात जाण्यास त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल, असंही सध्या कळत आहे. १२ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठीच्या संघातही त्या दोघांचा समावेश आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

करण जोहरच्या या चॅट शोचा एक भाग रविवारी प्रसारित करण्यात आला. ज्यामध्ये पांड्या आणि राहुल या दोघांनीही बऱ्याच खुलेपणाने गप्पा मारल्या खऱ्या. पण, महिलांविषयीच्या त्यांच्या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं. आपल्यावर होणाऱ्या या टीका पाहता पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली चूक कबुल करत दिलगिरी व्यक्त केली. तर, राहुलने अद्यापही त्याविषयीची कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 

बीसीसीआयच्या विनोद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार पांड्या आणि राहुल यांना त्यांच्या वक्तव्यांसाठी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून, येत्या २४ तासांमध्ये त्यांची उत्तरं अपेक्षित आहेत. त्यामुळे यावर आता हे दोन्ही क्रिकेटपटू नेमकी कोणती कारणं पुढे करणार याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.