मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील एका कार्यक्रमात त्याने आपल्या निवृत्तीचा घोषणा केली आहे. इरफानने आतापर्यंत भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ३१.५७ च्या सरासरीने १,१०५ धावा केल्या. भारतीय क्रिकेट विश्वात त्याची स्विंगचा किंग अशी ओळख आहे.
निवृत्तीची घोषणा करत त्याने संघातील सर्व सदस्य, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि अर्थातच आपल्या चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला, 'मी सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमधून निवृत्ती घेत आहे. माझ्यासाठी हा क्षण फार भावूक आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारख्या महान खेळाडूंसोबत खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचं त्याने सांगितलं.
त्याचप्रमाणे आपण फार छोट्या गावातून आल्याचे देखील त्याने यावेळेस सांगितले. निवृत्तीची घोषणा करताना पठाण फार भावूक झाला होता. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबर २०१२ रोजी खेळला होता. हा टी-२० सामना होता.
२००७ साली दक्षिण आफ्रिकेत भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयात पठाणचाही मोलाचा वाटा होता. इरफानने आतापर्यंत १२० वन-डे, २९ कसोटी आणि २४ टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तब्बल १५ वर्ष इरफान भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करत होता.