दुसऱ्यांदा बाप झाला हा भारतीय क्रिकेटपटू

भारतीय क्रिकेटपटूच्या घरी आला नवा पाहुणा

Updated: Mar 23, 2020, 08:17 PM IST
दुसऱ्यांदा बाप झाला हा भारतीय क्रिकेटपटू

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना दुसऱ्यांदा बाप झाला आहे. सोमवारी सुरेश रैनाच्या घरी नवा पाहुणा आला आहे. सुरेश रैनाची पत्नी प्रियंकाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. रैनाने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. सोबतच रैनाने मुलाचा फोटोही शेयर केला आहे.

'आशा, शक्यता आणि एका चांगल्या जगासह नव्या गोष्टींची सुरुवात. ग्रेसियाचा छोटा भाऊ आणि आमचा मुलगा रियो रैनाचं स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. सगळ्यांच्या आयुष्यात तो सुख, शांती आणि समृद्धी आणेल, हीच अपेक्षा', असं ट्विट रैनाने केलं आहे.

सुरेश रैनाची पहिली मुलगी ग्रेसियाचा जन्म मे २०१६ साली झाला होता. आयपीएलमध्ये रैना चेन्नईच्या टीमकडून खेळतो. चेन्नईच्या टीमनेही ट्विटरवरुन रैनाला शुभेच्छा दिल्या आहेत. हॅलो रियो, असं ट्विट चेन्नईने केलं आहे.

सुरेश रैना आयपीएलमध्ये विराट कोहलीनंतर सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. २०११ साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा रैना हिस्सा होता. गेल्या काही काळापासून रैना भारतीय टीमच्या बाहेर आहे.