मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहली नेहमीच विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरतो. सध्या तो चर्चेत आहे ते म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे. "I don't think you should live in India", असं म्हणत भारतीय खेळाडूंवर टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना त्याने भारतात राहण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं.
विराटने केलेलं हे वक्तव्य आणि नेटकऱ्यांच्या ट्विटला दिलेलं उत्तर पाहता त्याने अनेकांचा रोष ओढावून घेतला आहे.
एका वेगळ्याच मार्गाने विराटने व्यक्त केलेलं हे देशप्रेम अनेकांना रुचलंही नाही. नेटकऱ्यांनी विराटच्या जुन्या वक्तव्यांचा आणि ट्विटचा आधार घेत त्याच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
काही महिन्यांपूर्वी त्याने केलेल्या जुन्या ट्विटचा स्क्रिनशॉट पोस्ट करत एका युजरने लिहिलं, 'तुझा हा विचित्र तर्क पाहता तू स्वत:सुद्धा फक्त आणि फक्त भारतीय खेळाडू आणि भारतालाच पाठिंबा द्यायला हवा आहेस. त्यामुळे तसं पाहिलं तर तू सुद्धा हा देशा सोडला पाहिजे', असं ट्विट एका युजरने केलं.
Going by your weird logic, you should be supporting no one else apart from India and Indian players, so ideally you also 'get out of the country' #kohli pic.twitter.com/sfwkIkNP7u
— Melvin Louis S (@MelvinLouis) November 7, 2018
'क्रिकेट हा मुळातच परदेशातील खेळ आहे', असं म्हणत आणखी एका नेटकऱ्याने विराटवर तोफ डागली.
कोहलीवर होणाऱ्या या टीका पाहता आता, तो यावर आणखी काही प्रतिक्रिया देणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोशल मीडियावर विराट बऱ्यापैकी सक्रिय असल्यामुळे त्याच्यापर्यंत हे प्रकरणच पोहोचेल तेव्हा तो यावर काय उत्तर देतो याकडेच आता अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.