कैफ अहंकारी तर जडेजा बेशिस्त, शेन वॉर्नचे गौप्यस्फोट

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्ननं त्याचं आत्मचरित्र 'नो स्पिन'मध्ये भारतीय खेळाडूंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 

Updated: Nov 7, 2018, 10:48 PM IST
कैफ अहंकारी तर जडेजा बेशिस्त, शेन वॉर्नचे गौप्यस्फोट

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्ननं त्याचं आत्मचरित्र 'नो स्पिन'मध्ये भारतीय खेळाडूंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आयपीएल वेळच्या राजस्थान टीमसोबतच्या काही गोष्टी वॉर्ननं त्याच्या आत्मचरित्रातून सांगितल्या आहेत. वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थाननं पहिल्या वर्षीचं आयपीएल जिंकलं होतं. मोहम्मद कैफ अहंकारी असल्याचं वॉर्न त्याच्या पुस्तकात म्हणतो.

मोहम्मद कैफनं जे केलं त्यावर लगेचच उपाय शोधणं गरजेचं होतं. राजस्थान टीमसोबत आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा सगळे खेळाडू आपआपल्या खोलीची चावी घेऊन गेले. यानंतर मी टीमच्या मालकांसोबत रिसेप्शनवर बोलत होतो आणि कैफ तिकडे आला. मी कैफ आहे, असं तो रिसेप्शनवर म्हणाला. तेव्हा त्यांना तू कैफ आहेस हे माहिती आहे. तुला काय हवं आहे? असं मी त्याला विचारलं. तेव्हा मी एक वरिष्ठ खेळाडू आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूप्रमाणे मला छोटी खोली मिळाली आहे. मला मोठी खोली पाहिजे, असं कैफ म्हणाल्याचं वॉर्ननं पुस्तकात लिहिलं आहे.

यानंतर प्रत्येक खेळाडूप्रमाणेच तुलाही खोली मिळाली आहे. फक्त मलाच मोठी खोली देण्यात आली आहे कारण मला अनके जणांना भेटावं लागतं. माझ्या या उत्तरानंतर कैफ तिकडून निघून गेला. एक भारतीय वरिष्ठ खेळाडू म्हणून स्वत:ला जास्त महत्त्व पाहिजे असं त्याला वाटत होतं हे माझ्या उशिरा लक्षात आल्याचं वॉर्न म्हणाला. सगळ्यांनी मला समान सन्मान द्यावा म्हणून हा नियम बनवला असल्याचं वॉर्ननं सांगितलं.

मुनाफ पटेलचं वय किती?

वॉर्ननं या पुस्तकातून मुनाफ पटेलच्या वयावरही निशाणा साधला. मी मुनाफ पटेलला त्याचं वय विचारलं होतं. तेव्हा तुला माझं खरं वय सांगू का आयपीएलमध्ये सांगतो ते सांगू असा प्रश्न मुनाफनं मला विचारला. माझं आयपीएलसाठीचं वय २४ वर्ष आहे आणि खरं वय ३४ वर्ष आहे. मी माझं खरं वय सांगितलं तर माझी निवड होणार नाही. त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तोपर्यंत मी माझं वय ३० पेक्षा कमीच सांगणार आहे, असं मुनाफनं सांगितल्याचा दावा वॉर्ननं केला आहे.

रवींद्र जडेजा बेशिस्त

रवींद्र जडेजा हा बेशिस्त असल्याचा आरोपही शेन वॉर्ननं त्याच्या पुस्तकात केला आहे. जेव्हा आम्ही जडेजाचा खेळ बघितला तेव्हा त्याचा दृष्टीकोन आणि जोश मला आवडला. यामुळे आम्ही त्याला थोडी सूट दिली पण बेशिस्त वागणुकीमुळे युवा खेळाडू असलेला जडेजा चुकीच्या मार्गावर गेला असता, असं वॉर्नला वाटत होतं.

मैदानात अभ्यासासाठी जाण्यासाठी बस हॉटेलमधून सकाळी ९ वाजता निघाली. पण जडेजा वेळेत पोहोचला नाही. मैदानातही तो लेट पोहोचला. परत जाताना मी अर्ध्या रस्त्यात बस थांबवली आणि उशिरा येणाऱ्या खेळाडूंना चालत हॉटेलमध्ये यायला लावलं. यावर एका खेळाडूनं मस्करी केली तेव्हा त्याला पण चालत यायचीच शिक्षा दिल्याचं वॉर्न म्हणाला.