विराटची अनुष्कासाठी भावनिक, तितकीच खास पोस्ट

एका खास निमित्ताने त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Dec 11, 2019, 02:40 PM IST
विराटची अनुष्कासाठी भावनिक, तितकीच खास पोस्ट
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात आपल्या दमदार किरकिर्दीने नावलौकिक मिळवणाऱ्या विराट कोहली याने त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका तितक्याच जबाबदारीने निभावली. एक मुलगा, भाऊ, पती अशा प्रत्येक भूमिकेत विराटने त्याचा खऱ्या अर्थाने ठसा उमटवला. क्रिकेटचं मैदान गाजवणारा हा अवलिया सध्या गाजतोय तो म्हणजे एका सोशल मीडिया पोस्टमुळे. एका खास दिवसाचं औचित्य साधत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. तीसुद्धा एका खास व्यक्तीसाठी. 

विराटने ही पोस्ट शेअर करण्याचं कारण आहे, आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी त्याच्या जीवनात आलेलं एक नवं वळण. हे वळण, म्हणजे अनुष्का शर्मासोबतच्या वैवाहिक नात्याची सुरुवात. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबतच्या रिलेशनशिपनंतर विराटने तिच्याशी लग्नगाठ बांधत सहजीवनाची सुरुवात केली. याच दिवसाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत.

अनुष्काची साथ मिळाल्यामुळे व्यक्ती म्हणून आपण किती बदललो याबद्दल त्याने एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं असून, त्यासोबतच एक फोटोही जोडला आहे. या फोटोमध्ये विरुष्काच्या नात्यातील प्रेम पाहता या सेलिब्रिटी जोडीचा सर्वांनाच हेवा वाटत आहे. 

'वास्तवात सांगावं म्हणजे हे फक्त प्रेम आहे आणखी काहीच नाही. त्यातही जेव्हा अशा एका व्यक्तीशी भेट घडवून देव तुमच्यावर कृपा करतो जी व्यक्ती तुम्हाला दरदिवशी एकाच भावनेची जाणीव करुन देतो, ती भावना म्हणजे कृतज्ञतेची....', असं म्हणत विराटने अनुष्कासोबतचं नातं शब्दांत बांधण्याचा प्रयत्न केला. 

फक्त विराटच नव्हे, तर अनुष्कानेही या खास दिवसाचं औचित्य साधत एक फोटो पोस्ट केला आहे. विवाहसोहळ्यातील हा फोटो म्हणजे विरुष्काच्या जीवनातील काही दुर्मिळ क्षण आहेत, असंच म्हणावं लागेल. या फोटोसह तिने विक्टर ह्युगो लिखित एक ओळ कॅप्शनमध्ये लिहिली आहे. 'दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे जणू देवाचाच चेहरा पाहणं...', अशं ती ओळ. 'प्रेम ही फक्त भावना नाही. त्याहीपेक्षा जास्त काहीतरी आहे. प्रेम म्हणजे मार्गदर्शक, प्रेम म्हणजे जणू (जीवनाच्या) जहाजाला गती देणारा पंखा आणि निव्वळ सत्याकडे जाणारा एक मार्ग. मला हे सापडलं यात मी खरंच माझं नशीब समजते', असं लिहित अनुष्काने विराटसोबतचं तिचं नातं सर्वांपुढे ठेवलं. 

विराट आणि अनुष्का या दोघांनीही ज्या सुरेख पद्धतीने  त्यांच्या या सहजीवनातच्या प्रवासाचं दुसरं वर्ष सोशल मीडियावर साजरा केलं आहे, हे पाहता चाहत्यांच्याही डोळ्यांतही आनंदाश्रूच आले असणार यात शंका नाही. 'झी २४तास'कडूनही या #PowerCoupleला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.