पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला

स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू अडकला आहे.

Updated: Dec 10, 2019, 06:52 PM IST
पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला

लंडन : स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू अडकला आहे. नासीर जमशेद या खेळाडूने स्पॉट फिक्सिंग केल्याचं कबूल केलं आहे. नासीर जमशेद पाकिस्तानकडून ४८ वनडे आणि १८ टी-२० मॅच खेळला आहे. जमशेदने पाकिस्तान सुपर लीगमध्ये फिक्सिंग केल्याचं सांगितलं आहे. आता त्याच्यावर फेब्रुवारीमध्ये कारवाई होणार आहे.

३३ वर्षांच्या नासीर जमशेदने पीएसएलमध्ये फिक्सिंग केल्याचं आधी नाकारलं होतं. पण मॅनचेस्टरमध्ये सुनावणीवेळी त्याने आपण फिक्सिंग केल्याचं कबूल केलं. युसूफ अनवर आणि मोहम्मद एजाज यांनी खटला सुरु व्हायच्या आधीच लाच दिली असल्याचं सांगितलं होतं.

या खटल्याची सुनावणी करताना सरकारी वकिल म्हणाले, 'एका अंडरकव्हर पोलीस अधिकाऱ्यानं स्वत:ला फिक्सर असल्याचं सांगून स्पॉट फिक्सिंग नेटवर्कमध्ये जागा मिळवली. त्याने २०१६ साली बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये फिक्सिंगचे प्रयत्न केले. यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्येही त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्येही असंच केलं. दोन्ही प्रकरणांमध्ये एका ओपनरने पैसे घेऊन एका ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलवर रन काढणार नसल्याचं ठरवलं होतं.'

याआधी ऑगस्ट २०१८ साली भ्रष्टाचारविरोधी ट्रिब्युनलने जमशेदवर १० वर्षांची बंदी घातली होती. नासीरवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. यामध्ये नासीर दोषी आढळला. नासीर जमशेद २०१७साली क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चौकशी सुरु झाल्यानंतर पीसीबीच्या रडारवर होता. त्याला फेब्रुवारी २०१७ साली ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली होती.