मुंबई : भारतीय India क्रिकेट cricket संघात अनेक क्रिकेटपटूंनी आजवर त्यांच्या खेळाचं प्रदर्शन दाखवलं आहे. मुख्य म्हणजे याच खेळाच्या बळावर ही खेळाडू मंडळी मोठी झाली आहेत. अशा या खेळातून आता एका भारतीय क्रिकेटपटूनं काढता पाय घेतला आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित आपण स्वप्नांना अलविदा करत असल्याचं त्यानं सांगितलं.
क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून दूर जाण्याचा निर्णय घेणारा हा क्रिकेटपटू आहे, सुदीप त्यागी (Sudeep Tyagi). वयाच्या ३३ व्या वर्षी या अतिशय मोठ्या निर्णयाची माहिती त्यानं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली. आतापर्यंत आपण घेतलेल्या सर्व निर्णयांपैकी स्वप्नांचा निरोप घेण्याचा हा सर्वाधिक मोठा निर्णय़ होता, असं त्यानं लिहिलं.
महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्त्वाखाली एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाल्याबाबत त्यानं आभार व्यक्त केले. शिवाय मोहम्मद कैफ, आरपी सिंह, सुरेश रैना या आदर्शस्थानी असणाऱ्या खेळाडूंचेही त्यानं आभार मानले. क्रिकेटला अलविदा करणं कठीण असलं तरीही पुढील वाटचालीसाठी आपल्याला हा निर्णय़ घ्यावा लागत असल्याचं सुदीपनं सांगितलं.
बीसीसीआयपासून प्रशिक्षक आणि संघाच्या सपोर्ट स्टाफपर्यंत सर्वांचेच त्यानं आभार मानले. कुटुंबाचे आभार मानत आपल्या जीवनातील त्यांचं नेमकं स्थान त्यानं सर्वांपुढे ठेवले.
This is the most difficult decision i ever made , to say goodbye to my dream . #sudeeptyagi #teamindia #indiancricket #indiancricketer #bcci #dreamteam #ipl pic.twitter.com/tN3EzQy9lM
— Sudeep Tyagi (@sudeeptyagi005) November 17, 2020
काय म्हणते त्यागीची आकडेवारी...
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यागीनं ४१ सामन्यांमध्ये १०९ विकेट घेतले. २००९, २०१० मध्ये तो आयपीएलचाही एक भाग होता. तिथं चांगल्या कामगिरीनंतरच त्याला भारतीय क्रिकेट संघात काम करण्याची संधी मिळाली होती. सुदीपनं क्रिकेट वर्तुळातून काढता पाय घेत असल्याची पोस्ट लिहिताच त्याला अनेकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.