काकामिगारा : 'चक दे इंडिया' हा नारा खरा करुन दाखवलाय भारतीय महिला हॉकी टीमनं.... एशिया कप जिंकत भारतीय महिला हॉकी टीम 2018 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाली. फायनलमध्ये भारतीय टीमनं पेनल्टी शूटआऊटमध्ये मध्ये 5-4 नं चीनवर मात केली. गोलकीपर सवितानं भारतीय टीमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
हॉकी वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाल्यानंतर भारतीय महिला हॉकी टीमला आपल्या चेह-यावरचा आनंद लपवता आला नाही. राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं जपानमध्ये एशिया कप जिंकण्याची किमया साधली. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या या लढतीत भारतीय टीमनं बाजी मारली.
फायनल मॅचमध्ये भारतानं 5-4 नं चीनचा धुव्वा उडवला. भारतीय गोलकीपर सवितानं आपल्या अफलातून सेव्हनं भारतीय टीमचं 13 वर्षांनी एशिया कप जिंकण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं. आता 2018 मध्ये लंडनमध्ये होणा-या हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला टीम जगभरातील अव्वल टीम्सबरोबर विजेतेपद जिंकण्याच्या उद्देशानं उतरेलं. दरम्यान, एशिया कपच्या चीनबरोबरच्या फायनलमध्ये राणी रामपालच्या टीमनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळावर भर दिला.
मॅचमध्ये पहिला गोलही भारतानंचं केला. 25 व्या मिनिटाला नवज्योत कौरनं गोल झऴकावत आपल्या टीमला आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये भारतानं आघाडी घेतल्यानंतर दुस-या हाफमध्ये 47 व्या मिनिटाला चीननं गोल करत मॅचमध्ये बरोबरी साधली. यानंतर दोन्ही टीम्सला गोल करण्यात अपयश आलं. यानंतर मॅचचा निकाला पेनल्टी शूटआऊटवर लागला. पेन्ल्टी शूट आऊटमध्ये कॅप्टन राणी रामपालनं दोन गोल झळकावले. तर भारताची सर्वोत्तम गोलकीपकर सवितानं चीनचं आक्रमण रोखलं आणि भारतीय टीमचा विजय निश्चित केला. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारी सविता सर्वोत्तम गोलकीपर ठरली. महिला हॉकी टीमसाठी आगामी सिझन अतिशय खडतर असणार आहे. त्यामुळे राणी रामपालच्या टीमची खरी कसोटी ही कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये लागेल.