आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू लवकरच अडकणार विवाहबंधनात

पार पडला त्यांचा रोका 

Updated: Nov 24, 2019, 06:19 PM IST
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू लवकरच अडकणार विवाहबंधनात
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : क्रीडा जगतात अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन कुस्तीपटूंनी त्यांच्या जीवनातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केल्याचं वृत्त समोर येत आहे. ही आनंदाची बातमी दिली खऱ्या जीवनातील दंगल स्टार, कुस्तीपटू गीता फोगाट हिने. 

कुस्तीसारख्या खेळात महिलांचं प्रतिनिधीत्त्वं करणाऱ्या गीता फोगाट हिने तिच्या धाकट्या बहिणीचा रोका झाल्याचं जाहीर केलं. सोबतच या छोटेखानी समारंभातील काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले. आजच्या दिवशी बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांना रोक्यानिमित्त शुभेच्छा... असं कॅप्शन लिहित गीताने हे फोटो पोस्ट केले. ज्यामध्ये काही कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं. 

सोनीपत येथील हा सोहळा पार पडला. मुख्य म्हणजे प्रथा म्हणूनही हुंडा दिल्या जाणाऱ्या या भागात बजरंगने अवघ्या एका रुपयावर म्हणजे जवळपास हुंडा न घेताच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत केलं जात आहे. 

पुनिया आणि फोगाट अशा दोन्ही कुटुंबीयांनी रोका, साखरपुडा आणि लग्नसोहळ्यापर्यंत असे काही निर्णय घेण्याचं ठरवलं आहे, ज्यामुळे समाजाला महत्त्वाचे संदेश दिले जातील. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये बजरंग आणि संगीता यांचा विवाहसोहळा पार पडेल.