पहिल्या वनडेआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका

मार्शच्या अनुपस्थितीत त्याच्या जागेवर एश्टन टर्नरला संधी देण्यात आली आहे.

Updated: Jan 10, 2019, 05:39 PM IST
पहिल्या वनडेआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका title=

सिडनी : टेस्ट सीरिजमध्ये २-१ ने पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतात ३ वनडे मॅचच्या सीरिजला १२ तारखेपासून सुरुवात होणार आहे. पण या सीरिजच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श आजारी असल्यामुळे पहिल्या मॅचला मुकणार आहे. त्यामुळे हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का समजला जातोय. मार्शच्या अनुपस्थितीत त्याच्या जागेवर एश्टन टर्नरला संधी देण्यात आली आहे. मिशेल मार्श गेल्या दोन दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दिली आहे. तसंच पुढच्या दोन मॅचसाठी मार्श फिट आहे का याची चाचणी घेतली जाईल असं ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅन्गर म्हणाले.  

मार्शच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला भारताचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या मॅचमध्ये मार्शच्या जागी संधी देण्यात आलेल्या एश्टन टर्नरची स्थानिक क्रिकेटमधील कामगिरी ही उत्तम आहे. बिग बॅश लीगमध्ये टर्नरनं मागच्या तीन मॅचमध्ये अनुक्रमे ६०, ४७ आणि ४३ अशा रन केल्या आहेत, त्यामुळे त्याला टीममध्ये स्थान देण्यात आल्याचं प्रशिक्षक जस्टीन लॅन्गर यांनी सांगितलं. एश्टन टर्नर २०१७ मध्ये तीन टी-२० सामने खेळला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीमनं ४ टेस्ट मॅचची सीरिज २-१ ने खिशात घातली. तर याआधी झालेली ३ टी-२० मॅचची सीरिज १-१ ने बरोबरीत सुटली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियावर वनडे सीरिज जिंकण्याचं आव्हान आणि दबाव असणार आहे.

भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंग धोनी (विकेट कीपर), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद आणि मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया संघ : एरॉन फिंच (कर्णधार), उस्माम ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टोइनिस, एलेक्स कॅरी (विकेट कीपर), जॉय रिचर्डसन, बिली स्टैनलेक, जेसेन बेहरेनडोर्फ, पीटर सीडल, नॅथन लायन, एडम जम्पा आणि एश्टन टर्नर