IPL Auction 2018: मुंबईच्या 'पृथ्वी'ला दिल्लीची पसंती, क्षणात झाला कोट्यधीश

पृथ्वीसोबतच अंडर १९मध्ये खेळणाऱ्या शुभम गिल याला कोलकाता नाईट रायडर्सने एक कोटी ८० लाखाला विकत घेतले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 27, 2018, 06:47 PM IST
IPL Auction 2018: मुंबईच्या 'पृथ्वी'ला दिल्लीची पसंती, क्षणात झाला कोट्यधीश title=

बंगळुरू : केवळ क्रिकेट विश्वच नव्हे तर, देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आयपीएल २०१८साठी खेळाडूंचा लिलाव शनिवारी (२७ जानेवारी) पार पडला. यात मुंबईच्या पृथ्वी शॉनेही चांगलीच बाजी मारली. दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला चक्क १ कोटी २० लाख रूपयांना विकत घेतले. पृथ्वीसोबतच अंडर १९मध्ये खेळणाऱ्या शुभम गिल याला कोलकाता नाईट रायडर्सने एक कोटी ८० लाखाला विकत घेतले.

पृथ्वी आणि गिल दोघेही अनकॅप खेळाडू होते.

आयपीएल २०१८ साठी तब्बल ५७८ खेळाडू रिंगणात होते. यात २४४ क्रिकेटपडू कॅप प्लेअर आहेत. तर, इतर ३३२ खेळाडू अनकॅप सूचीमध्ये आहेत. कॅप खेळाडूंना दिली जाणारी बेस प्राईस २ कोटी तर, अनकॅप खेळाडूंसाठी २० लाख रूपये इतकी प्राईस होती. पृथ्वी आणि गिल दोघेही अनकॅप खेळाडू होते. त्यामुळे दोघांसाठीही २० लाख इतकी बेसप्राईस होती. मात्र, त्याला दिल्ली डेअर डेव्हिल्सने खरेदी केल्यावर तो कोट्यधीश झाला.

शालेय वयापासूनच पृथ्वी क्रिकेटसाठी नेहमीच चर्चेत

दरम्यान, पृथ्वीच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर अल्पसा कटाक्ष टाकता त्याने फर्स्ट क्लासच्या ९ सामन्यांमध्ये ९६१ धावा ठोकल्या आहेत. यात ५ शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. अगदी शालेय वयापासूनच पृथ्वी हा क्रिकेटसाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याची खेळी पाहता भारतीय क्रिकेट संघात तो दाखल होईल अशी चर्चा क्रीडा वर्तुळातून चर्चीली जात आहे. अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेतही पृथ्वी शॉ या नावाची झलक क्रिकेट वर्तुळाला झाली आहे.