IPL 2020: बंगळुरु आणि हैदराबाद मध्ये आज 'कांटे की टक्कर'

आज पराभूत झालेला संघ आयपीएलमधून होणार बाहेर...

Updated: Nov 6, 2020, 04:15 PM IST
IPL 2020: बंगळुरु आणि हैदराबाद मध्ये आज 'कांटे की टक्कर' title=

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील एलिमिनेटर राऊडमध्ये शुक्रवारी अबुधाबी येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. अनेक आव्हानांवर मात करून प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविणारा सनरायझर्स हैदराबाद संघ मजबूत स्थितीत आहे. हा सामना आज सायंकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.

एलिमिनेटर सामन्यात पराभूत झालेल्या संघाला स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागेल. तर विजयी संघ 8 नोव्हेंबरला क्वालिफायर -2 मध्ये दिल्ली कॅपिटल विरुद्ध सामना खेळेल. म्हणजेच क्वालिफायर-२ जिंकणारी टीम अंतिम फेरीत प्रवेश करेल, जिथे त्यांचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल. अंतिम सामना 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये होईल.

सनरायझर्सने दुसर्‍या टप्प्यात पॉईंट टेबलमध्ये आरसीबीच्या वरच्या क्रमांकावर तिसरे स्थान मिळवत प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी जोरदार कामगिरी केली. स्पर्धेच्या लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी पूर्णपणे एकमेकांपेक्षा वेगळी होती. आरसीबीने सलग चार सामने गमावल्यानंतर चौथ्या स्थानावर आहे तर सनरायझर्सने विजयाची हॅटट्रिक केली.

गेल्या तीन सामन्यात सनरायझर्सने दिल्ली कॅपिटल, आरसीबीचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्सचा पराभव केला. करो या मरोच्या शेवटच्या सामन्यात त्यांनी मुंबईला 10 विकेट राखून पराभूत केले. त्याचे श्रेय डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धिमान साहा या सुरुवातीच्या जोडीला जाते. दोघांनी दिल्लीविरुद्ध 107 धावा आणि मुंबईविरुद्ध 151 धावांची भागीदारी केली.

वॉर्नरने आतापर्यंत 14 सामन्यांत 529 धावा केल्या आहेत, तर साहाने शेवटच्या तीन सामन्यात 184 धावा केल्या आहेत. टीम मॅनेजमेंटने सलामीला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये साहाला संधी दिली नव्हती. पण त्यानंतर वॉर्नर आणि साहाने इतकी चांगली कामगिरी केली की मनीष पांडे, केन विल्यमसन, प्रियम गर्ग आणि जेसन होल्डर यांना मैदानावर येण्याची गरज देखील पडली नाही.

गोलंदाजीत सनरायझर्सकडे संदीप शर्मा, होल्डर, शाहबाज नदीम, टी नटराजन आणि रशीद खानसारखे इन-फॉर्मर गोलंदाज आहेत. संदीपने पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी केली असून डेथ ओव्हर्समध्ये नटराजनने चांगली कामगिरी केली. मध्यम ओव्हरमध्ये रशीद बर्‍यापैकी किफायतशीर ठरला.

दुसरीकडे विराट कोहलीच्या आरसीबीला त्यांची कामगिरी लक्षणीयरित्या सुधारण्याची गरज आहे. सलग चार सामने गमावल्यानंतर संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला असावा. कर्णधार कोहलीचे लक्ष मात्र मागील कामगिरी विसरून पुढील तीन सामन्यांसह जेतेपद पटकावण्यावर असेल. दिल्लीविरुद्ध आरसीबीचे फलंदाज अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत.

अ‍ॅरॉन फिंचची जागा घेणाऱ्या जोश फिलिपने चांगली कामगिरी केली आहे, पण चांगली सुरुवात त्याला मोठ्या खेळीत रूपांतरित करता आली नाही. युवा देवदत्त पाडिक्कल यांने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची चांगले खेळावे लागेल. गोलंदाजीत दुखापतीमुळे मागील सामना न खेळणार्‍या नवदीप सैनीला परत संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज, इसरू उडाना, ख्रिस मॉरिस वेगवान गोलंदाजी हाताळतील, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.