IPL 2020: विजयानंतरही वॉर्नर ट्रोल, केन विलियमसनचं कौतूक

केन विलियमसनने काल आयपीएलमधील पहिला सामना खेळला.

Updated: Sep 30, 2020, 02:59 PM IST
IPL 2020: विजयानंतरही वॉर्नर ट्रोल, केन विलियमसनचं कौतूक title=

अबुधाबी : आयपीएलच्या 11 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटलसचा 15 धावांनी पराभव केला. अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 गडी गमावून 162 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल, दिल्ली कॅपिटलला 20 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून केवळ 147 धावा करता आल्या.

सनरायझर्स हैदराबादच्या या विजयात डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियमसन आणि राशिद खान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आयपीएलच्या या हंगामातील केन विलियमसनचा हा पहिला सामना होता. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विलियमसनने सनरायझर्सकडून 26 चेंडूत 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीदरम्यान 5 चौकार लगावले.

केन विलियमसन परत आल्यामुळे त्यांचे चाहते खूप आनंदित आहेत आणि म्हणूनच ट्विटरवर विलियमसन ट्रेंड होत होते. त्याचबरोबर सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर पहिल्या दोन सामन्यांमध्ये केन विलियमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याने सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

दिल्ली कॅपिटलिज विरूद्ध खेळलेल्या सामन्यात वॉर्नरने 33 बॉलमध्ये 45 धावा केल्या होत्या, तर बेअरस्टोने 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. याशिवाय रशीद खानने 3 विकेट घेतल्या होत्या.