मुंबईत चाललंय काय? CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यू

Mumbai Man Run Over By BEST Bus Near CSMT: दोन दिवसांपूर्वीच कुर्ल्यात झालेल्या बेस्ट बस अपघाताची चर्चा ताजी असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळही असा एक अपघात झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 12, 2024, 10:46 AM IST
मुंबईत चाललंय काय? CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यू
सीएसएमटी परिसरात अपघात

Mumbai Man Run Over By BEST Bus Near CSMT: कुर्ल्यात भरधाव वेगातील बेस्टच्या बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकाच एक धक्कादायक प्रकार मुंबईचा मध्यवर्ती आणि सर्वात वर्दळीचा भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये घडला आहे. येथे एका बेस्ट बसने दिलेल्या धडकेमध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर (झोन 1) वालचंद हिराचंद मार्गावर हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मयत व्यक्तीची ओळख पटली आहे. हुसैनियार अंदुनी (वय 55 वर्ष) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणामध्ये एमआरए मार्ग पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञात बाईकचालकाचाही या अपघाताशी संबंध असल्याने त्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध

55 वर्षीय हुसैनियार यांना बेस्ट बसने सीएसएमटी स्थानकाजवळ धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. एका अज्ञात दुचाकीस्वाराने या वयस्कर व्यक्तीला धडक दिल्याने ही व्यक्ती बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली आली. यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी, अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे, असं पोलिसांनी सांगितलं. सीएसएमटीजवळच्या भाटिया सर्कलजवळ हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला. दुकाचीस्वाराने धडक दिल्याने या व्यवस्कर व्यक्तीचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली. यानंतर बाजूने जाणाऱ्या बसचं मागील चाक या व्यक्तीच्या अंगावरुन गेलं. गंभीर जखमी झाल्यानंतर काही क्षणांमध्ये या व्यक्तीने दुर्घटना झाली त्याच ठिकाणी प्राण सोडले. या प्रकरणामध्ये आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बाईकस्वाराचा शोध घेत आहेत. 

सेंट जॉर्ज रुग्णालयात नेला मृतदेह

हुसैनियार यांचा मृतदेह सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये बसचालक ज्ञानदेव जगदाळे यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. ज्ञानदेव यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवताना, मयत व्यक्ती चालक असताना तिला बाईकने धडक दिल्याने ती जमीनीवर पडली. त्यानंतरच हा गंभीर अपघात झाल्याचं बस चालकाने सांगितलं आहे. सदर बेस्टची बस अणुशक्ती नगर ते कुलाबा या मार्गावर धावत होती. या प्रकरणात मुख्य आरोपी हा अज्ञात बाईकस्वारच आहे. 

दोन दिवसांपूर्वीच मोठा अपघात

दोन दिवसापूर्वी बेस्टच्या बसने कुर्ल्यामध्ये अनेक वाहनांना धडक दिली होती. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता तर 49 जण जखमी झाले. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आता सीएसएमटीजवळही बेस्ट बसच्या अपघातात एकाला प्राण गमवावे लागलेत.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More