IPL 2021 KKR vs RR: वानखेडेवर आज शेवटचा सामना, राजस्थाननं शेअर केला भावुक व्हिडीओ

मुंबई मयानगरी सर्वांनाच भुरळ घालते...अशीच भुरळ राजस्थानच्या टीमलाही घातली. जाताजाता शेवटचा सामना आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरच्या आठवणी सांगणारा खास व्हिडीओ राजस्थाननं शेअर केला आहे.

Updated: Apr 24, 2021, 01:53 PM IST
IPL 2021 KKR vs RR: वानखेडेवर आज शेवटचा सामना, राजस्थाननं शेअर केला भावुक व्हिडीओ

मुंबई: राजस्थान रॉयल्स संघाचा आज वानखेडे स्टेडियमवर शेवटचा सामना होणार आहे. कोलकाता विरुद्ध आज राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे. मुंबईत चार सामने राजस्थान रॉयल्स संघ खेळला आहे. आता हा शेवटचा सामना संपवून दिल्लीसाठी जाणार आहे. 

राजस्थान रॉयल्स संघाने सामन्याआधी भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वप्न पाहाणं थांबवायचं नाही...असं कॅप्शन देत हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये आतापर्यंतच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सर्व आठवणी, तिथला सराव या सगळ्या गोष्टींची एक झलक दाखवणारा हा व्हिडीओ आहे. 

स्पर्धेतील दोन्ही टीम्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. दोघांनी अनुक्रमे 1-1 मॅच जिंकल्यात तर दोघांनाही 3 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकात्यावर गेल्या मॅचमध्ये चेन्नईनं मात केली होती. बंगळुरुनं राजस्थानला अक्षरशः नामोहरम केलं होतं. 

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन टीम्स आज आयपीएलमध्ये एकमेकांसोर उभे ठाकणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा मुकाबला होणार आहे.

कोलकाता वि. राजस्थानमध्ये कुणाचं पारडं जड? दोन्ही टीम्स पराभवातून धडा शिकणार?

 

चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली होती. चेन्नईच्या रन्सचा पाठलाग करताना कोलकात्याची अक्षरशः दमछाक होताना दिसली. दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्सनं चांगली झुंज दिली पण कोलकात्याला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. 

दुसरीकडे राजस्थान रॉयल्स बंगळुरुचं आव्हान मोडीत काढण्यात अपयशी ठरले. बंगळुरुच्या देवदत्त पड्डीकल आणि कॅप्टन विराट कोहलीनं राजस्थानला लोटांगण घालायला भाग पाडलं. त्यामुळे कोलकात्याच कॅप्टन ईऑन मार्गन राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये टीमची नव्या मोर्चेबांधणी तसंच स्ट्राँग रणनीती आखणं गरजेचं आहे. 

राजस्थानला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी चुका टाळाव्या लागतील. दोन्ही टीम्समध्ये उत्तम दर्जाचे प्लेअर्स आहेत जे मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी टीमसमोर मोठं आव्हान उभं करू शकतात. एकंदर दोन्ही टीम्सना नव्या आत्मविश्वासानं आणि पराभवाची मरगळ झटकून एकमेकांचं आव्हान परतवून लावायचं आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स आज विजय मिळवण्याचा मानस ठेवून मैदानात उतरतील.