IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये बुधवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात चुरशीचा सामना झाला. पंजाब किंग्जने हा सामना जिंकला तर मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पण सामन्यानंतर एक दृश्य पाहायला मिळाले, जे सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.
सामन्यानंतर पंजाब किंग्जचे फिल्डिंग कोच जॉन्टी रॉड्स याने मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरची भेट घेतली. विशेष म्हणजे सचिन समोर येताच जॉन्टी ऱ्होड्स त्याच्या पाया पडला. सचिननेही त्याला असं करण्यापासून रोखलं. हे दृष्य चांगलंच व्हायरल झालं आहे.
जॉन्टी ऱ्होड्सची गणना जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. तो दक्षिण आफ्रिकेचा हुकमी खेळाडू होता आणि त्याने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरविरुद्ध अनेक सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये जॉन्टी यापूर्वी मुंबई इंडियन्ससोबत होता, त्यामुळे दोघांचं चांगलंच बाँडिंग आहे.
मुंबई विरुद्ध पंजाब मॅच
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला अजूनही विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. सलग पाच पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. कालच्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईसमोर विजयासाठी 198 धावांचं आव्हान होतं. मुंबईच्या फलंदाजांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना 186 धावाच करता आल्या.