मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहे. पंधराव्या हंगामाची सुरुवात चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याने होणार आहे. त्यानंतर 27 मार्च रोजी मुंबई संघाचा आयपीएलमधील पहिला सामना आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
मुंबई संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यापूर्वीच आयपीएलमधून बाहेर होऊ शकतो. सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून अजूनही सूर्यकुमार यादव पूर्णपणे सावरू शकला नाही. तो बरा होऊन मैदानात उतरण्यासाठी आणखी काही दिवस जाऊ शकतात.
सूर्यकुमार यादव कमी बॉलमध्ये जास्त धावा करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या या स्फोटक फलंदाजीमुळे त्याला मुंबई संघाने रिटेन केलं होतं. 8 कोटी रुपये देऊन सूर्यकुमारला मुंबई संघाने रिटेन केलं होतं.
दुसऱ्या सामन्यापर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कदाचित दुसऱ्या सामन्यात तो पुन्हा मैदानात परतेल अशी आशा आहे. मात्र यावरही अजून अधिकृत माहिती मिळाली नाही. सूर्यकुमारच्या हाताला दुखापत झाली आहे.
हाताला दुखापत झाल्याने सूर्यकुमार यादवला श्रीलंकेविरुद्ध सीरिजमध्येही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता तो मैदानात कधी परतणार याची प्रतीक्षा मुंबई संघासोबतच चाहत्यांनाही आहे.