IPL2023 News : आयपीएलचा प्रत्येक सामना हा उत्साह आणि त्याची रंजक बाजू परमोच्च शिखरावर नेणारा असतो. सामन्यात सहभागी खेळाडू असो किंवा मत प्रेझेंटर मंडळी, समालोचक असो. प्रत्येकजण आपआपल्या परिनं क्रिकेटप्रेमंचं मनोरंजन करताना दिसत आहे. ज्यामुळं दिवसागणिक कितीही नाकारलं तरी आयपीएलची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. अशा या स्पर्धेची रंगत वाढत असतानाच आता एक निराशाजनक माहिती समोर आली आहे.
IPL 2023 मधील 50 वा सामना शनिवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमध्ये खेळवला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) या संघांमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. पण, सामना सुरु होण्याआधीच एकंदर परिस्थिती पाहता तो रद्द होऊ शकतो.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दिल्ली आणि नजीकच्या भागावर आज आणि पुढील काही दिवस अवकाळी पावसाचे ढग कायम राहणार आहेत. ज्यामुळं या भागात पावसाचा शिडकावा होऊ शकतो. पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज असल्यामुळं तूर्तास सामना पूर्णपणे रद्द होईल की नाही यावर प्रश्नचिन्हं कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये सायंकाळच्या वेळी तापमान 26 अंशांपर्यंत उतरेल. तर ताशी 16 किमी वेगानं वारेही वाहतील. अशा परिस्थितीत विरोधी संघाचं आव्हान परतवून लावण्यासोबतच हवामानाची मर्जी राखण्याचं आवाहनही या दोन्ही संघांपुढे असेल.
दिल्ली आणि बंगळुरू या दोघांपैकी एकाही संघानं बेजबाबदारपणे खेळ दाखवण्याचा धोका पत्करून चालणार नाही. कारण, इथं गोलंदाजांसोबतच संघातील फलंदाजांच्या फळीलाही दमदार कामगिरी करावी लागणार आहे. सध्याच्या घडीला गुणतालिका पाहिल्यास दिल्लीच्या तुलनेत बंगळुरूच्या संघाचं पारडं जड आहे. असं असलं तरीही सध्या अष्टपैलू खेळाडू आणि संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसी कोणतंही संकट ओढावू इच्छित नाही. तर बलाढ्य गुजरातला नमवल्यामुळं सध्या दिल्लीकरांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळं आता मैदानात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
देशात सध्याच्या घडीला पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं बऱ्याच भागांमध्ये पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात सातत्यानं बदलणारं हवमान पाहता अनेक राज्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. त्यातच चक्रिवादळाच्या इशाऱ्यामुळंही भारतात पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.