'स्ट्राइक रेट वाढव, कर्णधारपदाकडे लक्ष दे, विकेट्स..'; हार्दिकला चिमुकल्याचा खोचक सल्ला! Video Viral

Mumbai Indian Young Fan Viral Video About Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच हा व्हिडीओ समोर आला असून सध्या तो तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओतील मुलगा शब्द अन् शब्द खरं बोलला असल्याचं म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 11, 2024, 02:30 PM IST
'स्ट्राइक रेट वाढव, कर्णधारपदाकडे लक्ष दे, विकेट्स..'; हार्दिकला चिमुकल्याचा खोचक सल्ला! Video Viral title=
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Mumbai Indian Young Fan Viral Video About Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचा यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगमधील कर्णधार हार्दिक पंड्या हा चांगलाच चर्चेत आहे. सर्वात आधी पाच वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी अचानक हार्दिकला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय अनेकांना आवडला नाही. त्यातही पहिल्या 3 सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागल्याने मुंबईचे चाहते हार्दिकवर चांगलेच संतापले होते. सलग 3 पराभवांनंतर मुंबईच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं. या विजयानंतरही लोकांचा हार्दिकसंदर्भातील राग फारसा शांत झालेला नाही. हार्दिकला संघाचं गणितच समजत नाही असं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. 

विजयानंतरही हार्दिकवर टीका

वानखेडेच्या मैदानावर 7 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने 234 धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्मा, इशान किशन, टीम टेव्हीड आणि रोमारिओ शेफर्डने उत्तम फलंदाजी करत संघाला 200 पार धावा करण्यात मोलाचा हातभार लावला. या सामन्यामध्ये दिल्लीने 235 चं लक्ष्य गाठण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलं. हा सामना मुंबईने जिंकला. मात्र या सामन्यातील विजय सुद्धा शेवटच्या क्षणी रोमारिओ शेफर्डने 10 बॉलमध्ये 39 धावा केल्यानेच झालं चाहत्यांचं म्हणणं आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघाला 200 चा टप्पा ओलांडता आला यातच कर्णधार हार्दिकचं अपयश असल्याचं काही चाहत्यांचं म्हणणं आहे. 

छोट्या चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल

हार्दिक पंड्याची स्वत:ची वैयक्तिक कामगिरीही फारशी चांगली राहिलेली नाही. त्याने 27 च्या सरासरीने 108 धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या 4 सामन्यांमध्ये 7 ओव्हर गोलंदाजी करुन 76 धावा देत केवळ एक विकेट घेतली आहे. अनेक सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहऐवजी पंड्यानेच पहिली ओव्हर टाकल्याचं पाहूनही चाहत्यांना धक्का बसला. बरं धुलाई होत असतानाही पंड्याने गोलंदाजी सुरु ठेवल्याचं काही सामन्यांमध्ये पहायला मिळाल्याने पांड्याचं नेतृत्व दिशाहीन असल्याची टीका अनेकांनी केली. अनेकांनी तर पंड्याला कर्णधारपदावरुन काढून पुन्हा रोहितला कर्णधार करण्याचीही मागणी केली. अशीच मागणी करणारा एका छोट्या चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर पंड्याच्या कामगिरीवर एखाद्या जाणकाराप्रमाणे कारणमिमंसा केली आहे.  

रोमारिओ शेफर्डमुळेच वाचलो

"हार्दिक पंड्याला कर्णधारपदावरुन काढून टाकलं पाहिजे असं मला वाटतं. ज्या कर्णधाराने तुम्हाला 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या त्याच्याबद्दल तुम्ही एवढाही इमान कायम ठेवत नाही. मुंबई इंडियन्स भविष्याकडे पाहत आहे असं सांगत आहेत. मात्र हार्दिक कर्णधारपदही फार वाईट प्रकारे हाताळतो. पहिली ओव्हर स्वत: घेतो. दुसरी क्रोर्त्झीला दोतो. तुम्ही गुजरातविरुद्धच्या सामन्यात बुमराहची कामगिरी पाहा. पहिल्या तीन ओव्हरमध्ये कसली फटकेबाजी केली. नंतर बुमराहने शाहाची विकेटही घेतली. हार्दिकचा स्ट्राइक रेटही फार वाईट आहे. रोमारिओ शेफर्ड त्या शेवटच्या ओव्हरमुळेच आज आपण (मुंबई इंडियन्सचा संघ) वाचलो. आपले गोलंदाज चांगले आहेत. बरं झालं हार्दिकला गोलंदाजी नाही मिळाली. नाहीतर सामना 14 व्या ओव्हरलाच संपला असता," असं या चिमुकल्याने म्हटलं.

नक्की पाहा हे Photos: Inside Photos: 24 वर्षीय क्रिकेटपटूचं 16.5 कोटींचं घर पहिलं का? IPL च्या पैशातून मुंबईत घर खरेदी

हार्दिकला कर्णधार करणं योग्य आहे का?

रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवणं योग्य आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, "नाही नक्कीच हा निर्णय योग्य नव्हता. मला वाटतं हार्दिकला संघातही घ्यायला नको होतं. कॅमरॉन ग्रीन तुमच्यासाठी उत्तमप्रकारे धाव करतोय. विकेट्सही घेत आहे. मागील पर्वात हैदराबादविरुद्ध त्याने शतकही झळकावलं. मला माहितीये की सध्या त्याची कामगिरी चांगली होत नाहीये. पण तरीही तो हार्दिकपेक्षा चांगलाच खेळतो," असं या चिमुकल्याने म्हटलं.

हार्दिकला काय सल्ला देणार?

हार्दिकला काय सल्ला देणार? असा प्रश्न विचारण्यात आला असता या मुलाने, "स्ट्राइक रेट वाढव, कर्णधारपदाकडे लक्ष दे. विकेट्स काढ. खूप जास्त धावा देतो तो," असं सांगितलं. रोहित शर्माबद्दलचं मत जाणून घेताना त्याला कर्णधार म्हणून पाहायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, "प्रत्येक मुंबई इंडियन्सच्या चाहत्याला त्याला कर्णधार म्हणून पाहायचं आहे. धडाकेबाज सुरुवात करुन देतो तो डावाला. आजही त्याने उत्तम फटकेबाजी केली. 49 धावा केल्या त्याने. अक्षरच्या उत्तम बॉलवर तो बाद झाला. पण उत्तम खेळला तो," असं या मुलाने सांगितलं.

हार्दिकला सोडा, रोहितला रिटेन करा

पुढल्या वर्षी रोहित शर्मा मुंबई सोडणार अशी चर्चा असल्यासंदर्भात छेडलं असता या छोट्या चाहत्याने, "पुढील वर्षी मेगा ऑक्शन होणार ठाऊक आहे. पण माझ्यामते मुंबईने हार्दिकला करारमुक्त करुन रोहितला रिटेन केलं पाहिजे," असं मत व्यक्त केलं.

सध्या या चिमुकल्याच्या आत्मविश्वासाचं कौतुक होताना दिसत आहे. अनेकांनी हा अगदी मनापासून क्रिकेट पाहतो असं म्हटलं आहे. अनेकांनी या व्हिडीओतील मुलगा शब्द अन् शब्द खरं बोलला असल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला नक्की सांगा.