मुंबई : ''दुबे जी, मुलाला काय खायला घालता? तो एवढे मोठे सिक्स कसे मारतो?'' हा प्रश्न भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी शिवम दुबेला विचारला होता. ऑलराऊंडर असलेला शिवम दुबे मुंबईच्या रणजी टीमकडून खेळतो. २५ वर्षांचा शिवम दुबे यंदा आयपीएलच्या लिलावामुळे चर्चेत आला आहे. विराट कोहलीच्या बंगळुरूनं शिवमला ५ कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. शिवमची बेस प्राईज २० लाख रुपये एवढी होती. रणजी ट्रॉफीमध्ये ७ सिक्स मारून शिवम चर्चेत आला होता. पण शिवमचा सिक्सर किंग बनण्याचा प्रवास हैराण करणारा आहे.
शाळेमध्ये असताना शिवम दुबे मैदानात अजिबात फिट नव्हता, असं त्याचे शाळेचे प्रशिक्षक निलेश भोसले सांगतात. शिवम प्रतिभावान क्रिकेटपटू असला तरी लठ्ठ होता. शिवमला गायीचं ताजं दूध, बदाम आणि पिस्ता देण्यासाठी शिवमचे वडिल राजेश दुबे नेहमी मैदानात येत असत. शिवमच्या बॉलिंगमुळे आम्ही शाळेची अंडर-१४ स्पर्धा जिंकलो, पण फिटनेस आणि पाठीच्या दुखण्यामुळे शिवमच्या क्रिकेटवर परिणाम झाल्याचं मत निलेश भोसलेनं व्यक्त केलं.
फिट नसल्यामुळे शिवमला ५ वर्ष मैदानाबाहेर राहावं लागलं. १४ ते १९ वर्षांपर्यंत शिवम टीमच्या बाहेर होता. वैयक्तिक कारणामुळे बाहेर असल्याचं सांगताना वडिलांनी मला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं, अशी प्रतिक्रिया शिवमनं दिल्याची बातमी, इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. वडिलांना क्रिकेटमध्ये काहीच कळत नव्हतं, पण त्यांनी मला पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी तयार केलं. वडिलांनी घराजवळ एक छोटी खेळपट्टीही बनवल्याचं शिवमनं सांगितलं.
यानंतर शिवमनं पुन्हा अंडर-१९ क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि मग मागे वळून पाहिलं नाही. पुनरागमनानंतरच्या शानदार प्रदर्शनामुळे मुंबईच्या रणजी टीममध्ये शिवमला जागा मिलाली. या रणजी मोसमात शिवमनं ३ इनिंगमध्ये ९९.५० च्या सरासरीनं १९९ रन केले आहेत. २ मॅचमध्ये शिवमनं मुंबईकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.
लहान असल्यापासूनच मला क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. सहा वर्षांचा असताना आमच्या घरातला नोकर माझ्याशी क्रिकेट खेळायचा नाही. त्यानं टाकलेला प्रत्येक बॉल मी बिल्डिंग बाहेर मारायचो, त्यामुळे तो नेहमीच माझ्यासोबत क्रिकेट खेळायला नकार द्यायचा, असं शिवम म्हणतो. सुरुवातीला माझ्या वडिलांचा यावर विश्वास बसला नाही, त्यामुळे त्यांनी मला बॉलिंग टाकली, पण त्यांनाही तोच अनुभव आला. सहा वर्षांचा असताना माझ्यामध्ये असलेली एवढी ताकद बघून माझे वडिलही हैराण व्हायचे, असं शिवमनं सांगितलं.
२५ वर्षांच्या शिवम दुबेनं आयपीएल लिलावाच्या एक दिवस आधीच बडोद्याविरुद्ध ७६ रनची स्फोटक खेळी केली होती. या खेळीमध्ये ७ सिक्स आणि ३ फोरचा समावेश होता. शिवमनं डावखुरा स्पिनर स्वप्निल सिंगच्या लागोपाठ ५ बॉलवर ५ सिक्स मारले होते. यानंतर शिवमवर आयपीएलमध्ये मोठी बोली लागेल, हे जवळपास निश्चित होतं.
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना शिवमनं अनेकवेळा चांगली कामगिरी केली. रेल्वेविरुद्ध शिवमन ६९ आणि गुजरातविरुद्ध ५५ रन केले. कर्नाटकविरुद्ध शिवमनं ७ विकेट घेतले. मोठे शॉट्स मारण्याबरोबरच शिवम १४५ किमी प्रती तासानं बॉलिंग करतो.
शिवमची प्रथम श्रेणी कारकिर्द फार मोठी नाही. आतापर्यंत ६ प्रथम श्रेणी मॅचमध्ये शिवमनं ६३ च्या सरासरीनं ५६७ रन केले आहेत आणि २२ विकेट घेतले आहेत. याचबरोबर शिवमनं १८ लिस्ट ए मॅच (५० ओव्हर) आणि १३ टी-२० मॅच खेळल्या आहेत. शिवमनं १८ लिस्ट ए मॅचमध्ये २७.५५ च्या सरासरीनं २४८ रन आणि २३ विकेट घेतल्या, तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३ मॅचमध्ये १८९ रन आणि १० विकेट आहेत.