IPL : RCB ने विराट, मॅक्सेवलबरोबरच या गोलंदाजाला केलं रिटेन, भेदक गोलंदाजीची आहे दहशत

IPL 2022 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी सर्व संघ कायम ठेवलेले खेळाडू ठरवणार आहेत

Updated: Nov 30, 2021, 10:32 PM IST
IPL : RCB ने विराट, मॅक्सेवलबरोबरच या गोलंदाजाला केलं रिटेन, भेदक गोलंदाजीची आहे दहशत

मुंबई : आयपीएलचा चौदावा हंगाम (IPL 2021) नुकताच संपला आहे आणि आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची (IPL 2022). जगभरात आयपीएलचे चाहते आहेत, आणि सर्वाधिक पाहिली जाणारी ही क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत त्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनवर.

आगामी मोसमासाठी खेळाडू रिटेन (कायम) करण्याची आजची शेवटची तारीख आहे. नियमानुसार, एकूण 8 फ्रँचायजीना प्रत्येकी 4 खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवता येणार आहे. एका टीमला 3 भारतीय आणि 2 पेक्षा अधिक परदेशी खेळाडूंना रिटेन करता येणार नाही. 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने विराट कोहली (Virat Kohli) आणि ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) संघात कायम ठेवलं आहे. या व्यतिरिक्त आता आरसीबीने आणखी एका खेळाडूला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

संघात हा भेदक गोलंदाज कायम
RCB ने विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांच्याबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) संघात कायम ठेवलं आहे. मोहम्मद सिराजने गेल्या काही हंगामात आरसीबीसाठी शानदार कामगिरी केली आहे. सिराज 2018 पासून आरसीबीसाठी खेळतोय. 

आयपीएल 2021 मध्ये सिराजने 15 सामन्यात 11 विकेट घेतल्या. त्याच्या स्विग गोलंदाजीची मोठ मोठ्या फलंदाजांमध्ये दहशत आहे. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सिराजने संघात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

कोणाला किती पैसे
RCB ने तीन खेळाडू रिटेन केले आहेत. यात विराट कोहलीला 15 कोटी, ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी तर मोहम्मद सिराजला 7 कोटी रुपये मिळणार आहेत.

आरसीबीला मिळणार नवा कर्णधार
विराट कोहलीने गेल्या हंगामात आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आपल्या नेतृत्वात कोहली आरसीबीला एकदाही जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे आरसीबी आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. यासाठी श्रेयस आणि केएल राहुल मोठे दावेदार असू शकतात. तर अॅरोन फिंज आणि डेव्हिड वॉर्नर हे परदेशी खेळाडूंवरही कर्णधार म्हणून संघाची नजर असेल.