ऑस्ट्रेलिया : T20 वर्ल्डकप 2022 उद्यापासून सून सुरू होतोय. दरम्यान या स्पर्धेसाठी 16 पैकी 14 टीम्स आता ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्या आहेत. मात्र अजून दोन टीम्स ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्या नाहीत. या 2 टीम्स म्हणजे पाकिस्तान आणि न्यूझीलंड. या दोन्ही टीम्समध्ये सिरीज सुरु होती. शुक्रवारी या सिरीजचा अंतिम सामना झाला. या सामन्यानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझम आणि न्यूझीलंड टीमचा कर्णधार केन विलियम्सन टीमशिवाय ऑस्ट्रेलियाला रवाना झाले.
टीमपूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि किवी कर्णधार केन विलियम्सन हे दोघेच ऑस्ट्रेलियाला निघाले. यामुळे चर्चांना मात्र उधाण आलं. मुख्य म्हणजे यावेळी त्यांच्या सोबत टीम्स नव्हत्या.
मुळात मेगा इव्हेंटपूर्वी आयसीसीने पत्रकार परिषद आयोजित केलीये. यामध्ये सर्व कर्णधारांची उपस्थिती असणं गरजेचं असतं. यावेळी सर्व टीमचे कर्णधार एकत्र फोटोशूट करणार आहेत. यासाठीच केवळ पाकिस्तान आणि न्यूझीलंड टीमचे कर्णधार ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत.
16 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद सर्व फोटोशूट आणि इतर गोष्टींना अंतिम रूप देऊ इच्छित आहे. याशिवाय 15 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पत्रकार परिषद आयोजित केलीये. ज्यामध्ये सर्व टीम्सचे कर्णधार सहभागी होणार आहेत.
टी 20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी अवघ्या एका दिवसाचा अवधी उरला आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला असून भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म बघितला तर यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतील प्रबल दावेदार मानला जात आहे.