कपिल देव यांचा सल्लागार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

कपिल देव यांनी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Oct 2, 2019, 08:49 PM IST
कपिल देव यांचा सल्लागार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा title=

मुंबई : कपिल देव यांनी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कपिल देव या समितीचा राजीनामा देणारे दुसरे सदस्य आहेत. याआधी शांता रंगस्वामी यांनीही त्यांचं पद सोडलं होतं. बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी क्रिकेट सल्लागार समितीच्या तिन्ही सदस्यांना नोटीस पाठवली होती. या समितीमध्ये अंशुमन गायकवाड हे तिसरे सदस्य आहेत.

कपिल देव यांनी पदाचा राजीनामा द्यायचं कारण सांगितलेलं नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीला राजीनाम्याचा ई-मेल पाठवला आहे. 'खरं तर प्रशासकीय समितीनेच कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालची क्रिकेट सल्लागार समिती बरखास्त करण्यात आल्याचं सांगितलं पाहिजे होतं. कारण प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी फक्त प्रशिक्षकाच्या निवडीसाठीच क्रिकेट सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं', असं सूत्राने सांगितलं.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी सप्टेंबर महिन्यात क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. हे सदस्य अनेक भूमिका निभावत आहेत, असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं.

कपिल देव कॉमेंट्री करतात, ते फ्लडलाईड कंपनीचे मालकही आहेत, तसंच ते भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे सदस्यही आहेत. शांता रंगस्वामी या भारतीय क्रिकेटर्स असोसिएशन आणि सल्लागार समिती अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहेत. त्यामुळे हा परस्पर हितसंबंधांचा मुद्दा असल्याचा आरोप संजीव गुप्ता यांनी केला होता.

याआधी राहुल द्रविडलाही लोकपाल डीके जैन यांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड होण्याआधी द्रविड इंडिया सिमेंट्समध्ये होता. इंडिया सिमेंट्स ही आयपीएलच्या चेन्नई सुपरकिंग्सची मालकी असलेली कंपनी आहे. सौरव गांगुली, लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर याच्यावरही हितसंबंधांचे आरोप झाले होते.