रोहितचं खणखणीत शतक, हा विक्रम करणारा पहिला भारतीय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्माने शानदार शतक केलं आहे.

Updated: Oct 2, 2019, 05:05 PM IST
रोहितचं खणखणीत शतक, हा विक्रम करणारा पहिला भारतीय title=

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्माने शानदार शतक केलं आहे. दिवसाअखेरीस भारताचा स्कोअर २०२/० असा झाला आहे. पावसामुळे दिवसभरात फक्त ५९.१ ओव्हरचाच खेळ झाला. रोहित शर्मा ११५ रनवर नाबाद आणि मयंक अग्रवाल ८४ रनवर नाबाद खेळत आहे. रोहित शर्मा पहिल्यांदाच टेस्टमध्ये ओपनिंगला खेळत आहे. ओपनर म्हणून टेस्ट, वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा रोहित हा एकमेव भारतीय खेळाडू बनला आहे.

रोहित शर्माचं हे टेस्ट क्रिकेटमधलं चौथं शतक आहे. रोहितची सुरुवातीची २ शतकं त्याच्या पहिल्या २ मॅचमध्येच आली होती. यानंतर तिसऱ्या शतकासाठी रोहितला ४ वर्ष वाट पाहावी लागली. २०१३ साली रोहितने पहिली २ शतकं केली तर २०१७ साली रोहितला तिसरं शतक करता आलं. यानंतर २ वर्षांनी रोहितने चौथं शतक झळकावलं.

रोहित आणि मयंक अग्रवाल ही जोडी टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ओपनिंगला आली आहे. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ओपनिंगला द्विशतकी पार्टनरशीप करण्याचा विक्रम रोहित आणि मयंकने केला आहे. पहिल्याच मॅचमध्ये ओपनिंग करताना शतकी पार्टनरशीप करणारी रोहित-मयंकची ही सातवी जोडी आहे.

भारताकडून सगळ्यात पहिले १९६९-७० साली कानपूरमध्ये वीनू मंकड आणि फारूक इंजिनियर यांनी १११ रनची पार्टनरशीप केली होती. यानंतर १२ वर्षांनी सुनील गावसकर आणि अरुण लाल यांनी हा विक्रम केला. विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडने पहिल्यांदाच ओपनिंग करताना ४१० रन केल्या.

वसीम जाफर आणि दिनेश कार्तिकनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५३ रन केले. यानंतर मुरली विजय आणि शिखर धवनने २८९ रनची पार्टनरशीप केली. नुकताच टीममधून बाहेर झालेला केएल राहुलही या यादीत आहे. राहुलने पार्थिव पटेलसोबत १५२ रनची पार्टनरशीप केली होती.