मुंबई : टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने सर्बियाची मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टानकोविचसोबत साखरपुडा केला आहे. हार्दिकने बुधवारी इन्स्टाग्रामवर नताशासोबतचा फोटो टाकून साखरपुड्याची घोषणा केली. हार्दिकच्या या घोषणेनंतर नताशा कोण आहे? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
हार्दिकची होणारी बायको नताशा सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या चित्रपटातून नताशाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पण नताशाला बिग बॉस सिझन ८ आणि बादशाहचं गाणं 'डीजे वाले बाबू' या गाण्यातून प्रसिद्धी मिळाली.
नताशा २०१२ साली अभिनय क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी भारतात आली. मॉडेल म्हणून नताशाची सुरुवात फिलिप्स, कॅडबरी आणि जॉनसन ऍण्ड जॉनसन या ब्रॅण्डपासून झाली. अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि करिना कपूरच्या सत्याग्रह या चित्रपटात नताशा 'अइयो जी' या आयटम सॉन्गमध्ये दिसली.
२०१४ साली नताशाला प्रसिद्ध रॅपर बादशाहचा म्यूझिक व्हिडिओ 'बंदूक'मध्ये संधी मिळाली. डीजे वाले बाबू या गाण्यामुळे नताशा लोकप्रिय झाली. २०१४ मध्येच नताशा बिग बॉसच्या घरात गेली.
२०१६ साली नताशाने दिग्दर्शक सौरभ वर्मा यांच्या '7 Hours to Go' या चित्रपटात महिला पोलिसाची भूमिका बजावली. २०१७ साली नताशाने 'फुकरे रिटर्न्स'मध्ये महबुबा हे आयटम सॉन्ग केलं. शाहरुख, कतरिना आणि अनुष्काच्या झिरो या चित्रपटात नताशाला छोटी भूमिका मिळाली होती.
मागच्या वर्षी 'The Holiday' या वेब सीरिजमध्येही नताशाने काम केलं. रियलिटी डान्स शो 'नच बलिये'मध्ये नताशा अली गोनीसोबत थिरकली होती. नताशा आणि अली गोनी रिलेशनशीपमध्येही होते.