मुंबई : क्वीन्सलॅंड येथे सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यूज हेडनला गंभीर दुखापत झाली आहे. एका अपघातातून तो थोडक्यात बचावला आहे. या अपघातात त्याच्या मानेखाली आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हेडन क्वीन्सलँड येथे आपला मुलगा जोश सोबत सुट्टी घालवण्यासाठी आला होता.
हेडनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं की, "सी-6 लिगामेंट फ्रॅक्चर आहे. सी-4 आणि सी-5 लिगामेंटस फाटले आहे. मी एका मोठ्या अपघातातून वाचलो आहे". हेडनने त्याचा मित्र बेन आणि सुई केली यांचे आभार देखील मानले आहेत.
क्वीन्सलँडमध्ये याआधीही हेडनचा अपघात झाला होता. 1999 मध्ये त्याची बोट उलटली होती आणि तो तब्बल एक किलोमीटर अंतर पोहून किनारी आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अँड्रू साइमंड देखील होता. मॅथ्यूज हेडनने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हेडनने 103 टेस्ट आणि 161 वनडे सामने खेळले आहेत.