कार्डिफ : पहिल्या मॅचमध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम दुसरी टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी मैदानात उतरेल. ३ टी-२० मॅचच्या सीरिजमधली दुसरी मॅच शुक्रवारी कार्डिफमध्ये खेळवण्यात येत आहे. पहिल्या मॅचमध्ये चायनामन बॉलर कुलदीप यादवनं घेतलेल्या ५ विकेट आणि त्यानंतर लोकेश राहुलनं केलेल्या शतकामुळे भारताचा ८ विकेटनं दणदणीत विजय झाला. कुलदीप यादवच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. कुलदीपनं ४ ओव्हरमध्ये २४ रन देऊन ५ विकेट घेतल्या. कुलदीपचं हे कारकिर्दीतलं सर्वोत्तम प्रदर्शन आहे. इंग्लंडला २० ओव्हरमध्ये १५९ रनच बनवता आले. १६० रनचा पाठलाग करताना भारतानं १० बॉल बाकी असतानाच २ विकेट गमावून १६३ रन केल्या. लोकेश राहुलनं १०१ रनची खेळी केली.
इंग्लंडला या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला त्यातच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला भारताबद्दल केलेलं ट्विट चांगलंच महागात पडलं. कुलदीप यादवनं अडचणी निर्माण केल्या आहेत. पण भारतीय टीम ऑस्ट्रेलियापेक्षा थोडीशीच चांगली आहे, असं ट्विट मायकल वॉननं केलं. भारतीय नेटकऱ्यांनी वॉनला काहीच दिवसांपूर्वी झालेल्या इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या मॅचची आठवण करून दिली. या मॅचमध्ये स्कॉटलंडनं इंग्लंडचा धक्कादायक पराभव केला होता. काहींनी मायकल वॉनला टी-२० क्रिकेटची क्रमवारी दाखवली. क्रमवारीमध्ये भारत दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.
Kuldeep Yadav is causing absolutely chaos ....... The Indians are a little bit better than the Aussies ....... #ENGvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 3, 2018
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सगळ्या ६ मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला होता. त्या पार्श्वभूमीवर वॉननं हे ट्विट केलं आहे. याआधीही मायकल वॉनला भारतीय फॅन्सच्या रोशाचा सामना करावा लागला होता. सध्या जॉस बटलर हा महेंद्रसिंग धोनीपेक्षा चांगला विकेट कीपर बॅट्समन असल्याचं वॉन म्हणाला होता.