लिसेस्टर : भारताची कर्णधार मिथाली राज हिने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणाऱ्या महिलांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसह अनेक भारतीय क्रिकेटरांनी मितालीला शुभेच्छा दिल्या. विराट कोहलीने मितालीच्या या यशाला भारतीय क्रिकेटचा ‘शानदार क्षण’ असल्याचं म्हटलं आहे. सचिनने ही ट्विट करत म्हटलं की, 'महिलांमध्ये वनडेमध्ये सर्वाधिक रन करणारी खेळाडू बनणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शानदार खेळी केली.'
विराटने म्हटलं भारतीय क्रिकेटचा 'शानदार क्षण'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटर केलं की, 'भारतीय क्रिकेटचा हा शानदार क्षण आहे. आज महिला वनडे क्रिकेट इतिहासात मिताली सर्वाधिक रन बनवणारी क्रिकेटर बनली आहे. चॅम्पियन प्रदर्शन.'
मिथालीने हा विक्रम केल्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारी जुलन गोस्वामी आणि सर्वाधिक धावा काढणारी मिथाली अशा दोन्ही भारतीय खेळाडू झाल्या आहेत. मिथालीने आतापर्यंत १८३ सामन्यात १६४ इनिंग खेळत ४२ वेळा नाबाद राहत ६०१५ धावा काढल्या आहेत. यात ४९ अर्धशतकं आणि पाच शतके झळकावली आहेत. तीने ५१.८१ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. तिची वन डेमधील सर्वाधिक धावसंख्या ११४ आहे.