वर्ल्डकपच्या निमित्ताने सध्या भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची तुफान चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील मोहम्मद शमीने आपल्या खेळीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. मोहम्मद शमीच्या यशामागे फार मोठा संघर्ष आहे. त्याचा हाच संघर्ष आता पुस्तकाच्या माध्यमातून क्रिकेटरसिक आणि इतरांना वाचायला मिळणार आहे. उत्तराखंडच्या खानपूर येथील अपक्ष आमदार उमेश कुमार मोहम्मद शमीचा हा प्रवास शब्दात मांडणार आहेत. या पुस्तकाचं नाव '30 Days With Shami' असं आहे.
उमेश कुमार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, "मोहम्मद शमीच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळावर मी पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एका महिन्यातील घटनांबद्दल सांगणार आहे. या महिन्यात त्याच्यावर पाकिस्तानह फिक्सिंग केल्याचा आरोप झाल्यानंतर 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या एका महिन्यात त्याने फार काही अनुभवलं. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी कठीण होता. तो एक महिना जेव्हा त्याने माझ्या घऱाच्या 19 व्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पुस्तकाचं नाव आहे 30 Days With Shami".
उमेश कुमार यांनी मोहम्मद शमीसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "हा तोच मुलगा आहे ज्याच्यावर पत्नीने बलात्कार आणि हुंड्याचा आरोप लावला होता. हा तोच मुलगा आहे ज्याच्यावर पत्नीने पाकिस्तानसह मॅच फिक्सिंगसाठी पैसे घेतल्याचा आरोप लावून चौकशी सुरु केली होती. हा तोच मुलगा आहे जो आत्महत्या करु इच्छित होता. हा तोच मुलगा आहे ज्याची आई, बहिण, भावाला जेलमध्ये पाठवण्याचा कट आखण्यात आला. हा तोच मुलगा आहे ज्याला खोट्या आरोपांमुळे वर्ल्डकप सुरु होण्याच्या दोन दिवस आधी कोलकाता कोर्टात एखाद्या आरोपीप्रमाणे डोळ्यात अश्रू आणून जामीन मिळवण्यासाठी उभं राहावं लागलं होतं. पण अजून सगळी गोष्ट बाकी आहे माझ्या मित्रा मोहम्मद शमी. तुझ्यासाठी एक शेर आहे.. मैं आंधियों के पास तलाश-ए-सबा में हूं, तुम मुझ से पूछते हो मिरा हौसला है क्या".
ये वही लड़का जिस पर इसकी पत्नी ने बलात्कार और दहेज का मुक़दमा लगवाया था। ये वही लड़का है जिस पर इसकी पत्नी ने पाकिस्तान के साथ मैच फिक्सिंग के पैसे लेने का आरोप लगाकर जाँच शुरू करवायी थी। ये वही लड़का है जो आत्महत्या करना चाहता था। ये वही लड़का है जिसकी माँ बहन भाई को जेल भिजवाने… pic.twitter.com/mWfOLSQ8gs
— Umesh Kumar (@Umeshnni) November 5, 2023
बुधवारी मुंबईतील वानखेडे मैदानात भारत-न्यूझीलंड सेमी-फायनल सामना पार पडला. या सामन्यात भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी यावेळी न्यूझीलंडसमोर 397 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार रोहित शर्माने स्फोटक सुरुवात करत 29 चेंडूत 47 धावा कुटल्या. शुभमनने 80 धावा केल्या, मात्र क्रॅम्पमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर न्यूझीलंड गोलंदाजांवर तुटून पडले आणि शतकं ठोकली. के एल राहुलने 20 चेंडूत 39 धावा ठोकल्या.
यानंतर न्यूझीलंड संघाचा सहज पराभव होईल असं वाटत होतं. पण त्यांनीही भारताला चांगली झुंज दिली. अखेर 70 धावांनी त्यांचा पराभव झाला. मोहम्मद शमीने एकूण 7 विकेट्स घेत इतिहास रचला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते जगभरातील अनेक मोठ्या व्यक्तींनी मोहम्मद शमीचं कौतुक केलं. मोहम्मद शमीने या वर्ल्डकपमध्ये 6 सामन्यात 23 विकेट्स घेतले आहेत. इतकंच नाही तर 50 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.