टेस्ट टीममध्ये निवड झाल्याच्या एका तासात मोहम्मद शमीला धक्का

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे.

Updated: Jul 18, 2018, 08:21 PM IST
टेस्ट टीममध्ये निवड झाल्याच्या एका तासात मोहम्मद शमीला धक्का  title=

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. या टीममध्ये फास्ट बॉलर मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. पण टीममध्ये निवड झाल्याच्या एका तासामध्येच शमीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे शमी अडचणीत येऊ शकतो. मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीचा गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. मार्च महिन्यापासून सुरु झालेला हा वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीये. या वादाप्रकरणी कोलकात्याच्या अलीपूर न्यायालयानं मोहम्मद शमीला समन्स पाठवला आहे. चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यामध्ये हसीन जहांनं मोहम्मद शमीविरोधात केस दाखल केली होती. यामध्ये महिन्याला १० लाख रुपये द्यायची मागणी हसीननं केली होती. यानंतर हसीन जहांचे वकील जाकिर हुसैन यांनी दावा केला की शमीनं हसीन जहांला १ लाख रुपयांचा चेक दिला. पण तो चेक बाऊन्स झाला. या केस प्रकरणी अलीपूर न्यायालयानं शमीला समन्स बजावलाय.

हसीन जहांनं मोहम्मद शमीवर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे अत्यंत गंभीर आरोप केले होते. अर्थातच शमीनं हे सर्व आरोप फेटाळून लावले. हसीन जहांनं मोहम्मद शमीवर असाही आरोप केला की ते ईदनंतर दुसऱ्या विवाहाची तयारी करतोय. यावर, असं असेल तर या विवाहात मी हसीनला नक्की बोलावेन, असं मोहम्मद शमीचं म्हणणं होतं. या वादानंतर हसीन आणि मोहम्मद एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. हसीननं शमीकडे आपल्या उदरनिर्वाहासाठी पैशांची मागणी केली होती. परंतु, त्यावरही काही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळेच आता हसीननं आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय.

शमी आयुष्यात परत येणार नाही असं दिसल्यानंतर हसीन जहाँनं आपल्या करिअरबद्दल पुन्हा विचार सुरू केलाय. नुकतंच तिनं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्टही केलीय.

या व्हिडिओत हसीन जहाँ बोल्ड लूकमध्ये एक फोटोशूट करताना दिसतेय. उल्लेखनीय म्हणजे, मोहम्मद शमीसोबत विवाहापूर्वीही हसीन मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत होती आणि आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सची चीअरलीडरही होती.