रांची : धोनीचं गाड्यांवर असलेलं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. धोनीला अनेकदा आपण मैदानात बाईकवर फेरफटका मारतानाही पाहिलं आहे. त्यातच आता परत एकदा धोनीचा हाच अंदाज त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर येथे झालेली दुसरी मॅच भारताने जिंकली. यानंतर आता तिसरी मॅच धोनीच्या होमपीचवर म्हणजेच रांची येथे खेळवली जाणार आहे. त्यामुळे भारतीय टीम रांचीमध्ये पोहचली. रांचीतील एअरपोर्टवर पोहचण्याच्या आधीच धोनीने एअरपोर्टवर आपली आवडती 'हमर' गाडी मागवून ठेवली होती.
ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या बहुतांश खेळाडूंनी बसनेच हॉटेल गाठले. पण धोनी, केदार जाधव आणि ऋषभ पंत यांनी धोनीच्या गाडीतून प्रवासाचा आनंद घेतला. या गाडीतून धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी कामगिरी केलेल्या केदार जाधव याला तसेच ऋषभ पंतला गाडीची सफर घडवली. या प्रवासाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत धोनी आपल्याला गाडी चालवताना दिसत आहे. तर त्याच्या शेजारी केदार जाधव बसलेला आहे. तसेच मागील बाजूस भारताचे काही खेळाडू बसले आहेत. रांची धोनीचे होम ग्राऊंड आहे. त्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात येथूनच केली. आपल्या शहरात भारतीय टीम आली आहे. त्यामुळे धोनीने आपल्या टीमचे रांचीकडून स्वागत केले.
धोनीने आतापर्यंत रांचीतील या मैदानवार तीन मॅच खेळला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी तिसरी मॅच ही धोनीची या मैदानावरील चौथी मॅच असेल. धोनी आपल्या स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. पण धोनीची अशी स्फोटक खेळी रांचीच्या या मैदानावर क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आता तरी धोनी त्याच्या होमपीचवर धडाकेबाज खेळी करेल, अशी आशा प्रत्येक क्रिकेट प्रेमीला आहे.
या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन मॅचपैकी एका मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, तर एका मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर २०१३ला झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच रद्द करण्यात आली होती.
धोनीने याआधी अनेकदा मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या सहकाऱ्यांना गाडीची सफर घडवली आहे. यावरुन गाड्यांवर त्याचे धोनीचे किती प्रेम आहे, हे स्पष्ट होते.
याआधी २०१७ साली भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर होती. त्यावेळेस भारताने धोनीच्या नेतृत्वात श्रीलंकेचा ५-० ने सूपडासाफ करत सीरिज जिकंली होती. या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केल्याने जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द सीरिज म्हणून गाडी देण्यात आली होती. ही गाडीही धोनीनं चालवली होती.
धोनीच्या गाडीप्रेमाचे अनेक किस्से आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वेरी वेरी स्पेशल लक्ष्मण याने एक किस्सा सांगितला आहे. धोनीने माझ्या १०० व्या टेस्टच्या वेळी टीम इंडियाची गाडी नागपूर एअरपोर्ट पासून स्टेडिएम पर्यंत चालवली होती. हा किस्सा लक्ष्मणने आपल्या आत्मचरित्रातील २८१ अॅण्ड बियॉण्ड या पुस्तकात सांगितला आहे.