मुंबई : भारताचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी जुलै महिन्यानंतर भारताकडून खेळला नाही. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध धोनी शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. त्यामुळे धोनीचं भवितव्य नेमकं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच भारताचा स्पिनर कुलदीप यादवने धोनीची कमी जाणवत असल्याचं वक्तव्य केलं आहे. विकेट कीपर म्हणून केएल राहुल आणि ऋषभ पंत चांगली कामगिरी करत आहेत, पण धोनीच्या अनुभवाची कमी जाणवते, असं कुलदीप म्हणाला आहे.
कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे दोन स्पिनर वर्ल्ड कपपर्यंत भारतीय टीमचा प्रमुख भाग होते. पण रवींद्र जडेजाच्या पुनरागमनानंतर चहल किंवा कुलदीप यांच्यापैकी एकालाच टीममध्ये संधी मिळते. कोणला घेऊन खेळायचं हे टीम प्रशासनावर अवलंबून असल्याची प्रतिक्रिया कुलदीपने दिली.
'आमची टीम खूप मजबूत आहे. सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. टीममध्ये कोणाला खेळवायचं हे टीम प्रशासनावर अवलंबून आहे. जडेजा बॅट्समन, बॉलर आणि फिल्डर म्हणून चांगलं प्रदर्शन करत आहे. जडेजा असल्यामुळे टीम मजबूत होते. जडेजा असल्यामुळे बॅटिंग वाढते. जेव्हा मला आणि चहलला एकत्र संधी मिळते, तेव्हा आम्ही सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करतो,' असं कुलदीप म्हणाला.
१२ मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये निवड होण्याची कुलदीपची अपेक्षा आहे. या वनडे सीरिजनंतर आयपीएल होणार आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर याचा फायदा टी-२० वर्ल्ड कपसाठीही होईल. आयपीएलसाठी तयार असल्याचं कुलदीप यादवने सांगितलं.