मुंबई : भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे सदस्य एम.एस.के.प्रसाद यांनी धोनीसोबत घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे. मागच्यावर्षी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या मॅचवेळी धोनी जखमी झाला होता. त्यामुळे या मॅचमध्ये धोनी खेळणार नाही हे जवळपास निश्चित होतं. पण या मॅचमध्ये धोनी खेळला आणि त्यानं भारताला जिंकवूनही दिलं.
बांग्लादेशमध्ये झालेल्या आशिया कपवेळी पाकिस्तानविरुद्धच्या मॅचआधी धोनीच्या पाठीला दुखापत झाली होती. पण आराम करायचा सोडून त्यानं मॅच खेळली. माझा एक पाय नसला तरी पाकिस्तानविरुद्धची मॅच मी खेळणार, असं धोनी म्हणाल्याचं प्रसाद यांनी सांगितलं आहे.
जिममध्ये व्यायाम करत असताना धोनीच्या पाठीत दुखायला लागलं आणि तो हातातल्या वजनासकट खाली पडला. त्यावेळी धोनीला चालताही येत नव्हतं. स्ट्रेचरवरून धोनीला नेण्यात आल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.
धोनीची ही अवस्था बघून पार्थिव पटेलला मॅचसाठी बोलवण्यात आलं होतं, पण मॅचआधी धोनी पॅड घालून तयार होता, अशी प्रतिक्रिया प्रसाद यांनी दिली आहे.
या मॅचचं महत्त्व मला माहिती होतं, त्यामुळे मॅचच्या आधल्या दिवशी रात्री मी धोनीच्या रूममध्ये गेलो. त्यावेळी धोनी रूममध्ये नव्हता तर स्विमिंग पूलच्या शेजारी चालण्याचा सराव करत होता. या अवस्थेमध्ये तू कसा खेळू शकशील असं प्रसादनं धोनीला विचारलं. पण एक पाय नसला तरी ही मॅच मी खेळणार, असं धोनी म्हणाला.