सागर कातुर्डे ठरला 'मुंबई महापौर श्री'

तळवलकर्स माजी महाराष्ट्र श्री सागर कातुर्डेने अखेर आपल्या यशाचे खाते उघडले. सुनीत जाधवच्या महाकाय शरीरयष्टीपुढे काहीसा झाकोळला गेलेल्या सागरने त्याच्याच अनुपस्थितीत अत्यंत रोमहर्षक झालेल्या 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन'च्या लढतीत माजी मुंबई श्री अतुल आंब्रे, रितेश नाईक, श्रीनिवास खारवीचे कडवे आव्हान मोडले आणि तब्बल दीड वर्षानंतर मुंबई महापालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री स्पर्धेवर आपले नाव कोरले. किताबाच्या लढतीप्रमाणे उपविजेतेपदाची लढतही रंगली, ज्यात गोल्ड जिमच्या रितेश नाईकने अनपेक्षितपणे अतुल आंब्रेला धक्का देत बाजी मारली.

Updated: Mar 18, 2018, 03:35 PM IST
सागर कातुर्डे ठरला 'मुंबई महापौर श्री'   title=

मुंबई : तळवलकर्स माजी महाराष्ट्र श्री सागर कातुर्डेने अखेर आपल्या यशाचे खाते उघडले. सुनीत जाधवच्या महाकाय शरीरयष्टीपुढे काहीसा झाकोळला गेलेल्या सागरने त्याच्याच अनुपस्थितीत अत्यंत रोमहर्षक झालेल्या 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन'च्या लढतीत माजी मुंबई श्री अतुल आंब्रे, रितेश नाईक, श्रीनिवास खारवीचे कडवे आव्हान मोडले आणि तब्बल दीड वर्षानंतर मुंबई महापालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री स्पर्धेवर आपले नाव कोरले. किताबाच्या लढतीप्रमाणे उपविजेतेपदाची लढतही रंगली, ज्यात गोल्ड जिमच्या रितेश नाईकने अनपेक्षितपणे अतुल आंब्रेला धक्का देत बाजी मारली.

अंधेरी पूर्वेला शेर-ए-पंजाब सोसायटीत मुंबई उपनगर बॉडी-बिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन आणि बृहन्मुंबई बॉडी-बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने भव्य-दिव्य झालेल्या मुंबई महापौर श्री स्पर्धेत अंधेरीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. महापौर निधीतून केवळ दीड लाख रूपये मिळूनही संघटनेचे अध्यक्ष अमोल किर्तीकर आणि कार्यकारी उपाध्यक्ष प्रवीण पाटकर यांच्या पुढाकारामुळे मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले. या स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूच सहभागी झाले नाहीत तर तब्बल चार हजार क्रीडाप्रेमींच्या अभूतपूर्व गर्दीने शेर-ए-पंजाब सोसायटीचे मैदान अक्षरशा फुलले होते.

आजची स्पर्धा खऱ्या अर्थाने तगडी झाली. सुनीत जाधवच्या अनुपस्थितीमुळे जेतेपदाची लढत चुरशीची होणार निश्चित होते आणि तसेच झाले. एकंदर सात गटात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात किमान दहा-बारा खेळाडू असल्यामुळे गटातील सहा खेळाडू निवडतानाही जजेसना डोळे उघड़े ठेवावे लागले. 55 किलो वजनी गटात नितीन शिगवणपेक्षा सरस प्रदर्शन करीत संदेश सकपाळने बाजी मारली. मात्र 60 किले वजनी गटात नितीन म्हात्रेपुढे कुणाचेही काही चालले नाही. त्याने अपेक्षेप्रमाणे अव्वल स्थान पटकावले. 65 किलो वजनी गटात गटविजेतेपदासाठी आदित्य झगडे आणि प्रतिक पांचाळची कंपेरिजन झाली, ज्यात प्रतिक सरस ठरला. माँसाहेबचा श्रीनिवास खारवी 70 किलो वजनी गटात पहिला आला. 75 किलो गटात रितेश नाईकने आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करीत यश संपादले. पुढच्या गटात सागर कातुर्डेसमोर सुशील मुरकर आणि सुशांत रांजणकरला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सर्वात चुरस पाहायला मिळाली सर्वात शेवटच्या गटात या गटात अतुल आंब्रेने सकिंदरचे आव्हान संपवले. या गटात श्रीदीप गावडे आणि रोहन धुरी हेसुद्धा चांगल्या तयारीत होते.

गटाच्या लढतीनंतर किताबाच्या लढतीत अतुल आंब्रे भीमकाय वाटत होता, मात्र अनुभवी सागर कातुर्डेने त्याच्यापेक्षा आखीव रेखीव आणि पीळदार स्नायूंचे प्रदर्शन करीत अनपेक्षितपणे बाजी मारली. एवढेच नव्हे तर उपविजेतेच्या लढतीत अतुलपेक्षा रितेश नाईक वरचढ ठरला. हा निर्णय क्रीडाप्रेमींसाठी धक्कादायक होता, पण जजेसनी कंपेरिजनमध्ये रितेशच्या पारड्यात आपले मत टाकले. या थरारक स्पर्धेचा पुरस्कार सोहळा महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अनिल परब, आमदार रमेश लटके, नगरसेवक बाळा नर, सदानंद परब, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, अमोल कीर्तीकर, सरचिटणीस राजेश सावंत, सुनील शेगडे आणि कार्याध्यक्ष प्रवीण पाटकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुंबई महापौर श्री 2018 चा निकाल

55 किलो वजनी गट : 1. संदेश सकपाळ, 2. नितीन शिगवण, 3. ओमकार आंबोकर, 4. उपेंद्र पांचाळ, 5, रमेश जाधव, 6. सचिन लोखंडे

60 किलो : 1. नितीन म्हात्रे, 2. विनायक गोळेकर, 3. बप्पन दास, 4. राजेश तारवे,  5. तुषार गुजर, 6. विराज लाड

65 किलो : 1. प्रतिक पांचाळ, 2. आदित्य झगडे, 3. जगदिश कदम, 4. वैभव महाजन, 5. निरवाल गोळे, 6. आर विल्सन

70 किलो : 1. श्रीनिवास खारवी, 2. विशाल धावडे, 3. चिंतन दादरकर, 4. विनायक लोखंडे, 5. श्रीकांत झुलम, 6. अमित साटम

75 किलो : 1. रितेश नाईक, 2. विघ्नेश पंडित, 3. अमोल गायकवाड, 4. रोहन गुरव,  5. दशरथ दळवी, 6. महेश शेट्टी 

80 किलो : 1. सागर कातुर्डे, 2. सुशील मुरकर, 3. सुशांत रांजणकर, 4. सुधीर लोखंडे, 5. अभिषेक खेडेकर, 6. विनीत मोरे

80 किलोवरील : 1. अतुल आंब्रे, 2. सकिंदर सिंग, 3. रोहन धुरी, 4. श्रीदिप गावडे, 5. नितीन रुपारेल, 6. रोशन कांबळी

मुंबई महापौर श्री : सागर कातुर्डे 

उपविजेता  :  रितेश नाईक