Virender Sehwag On India Vs Bharat Debate: देशाचं नाव बदलून 'इंडिया'ऐवजी 'भारत' ठेवण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 'इंडिया' नाव संविधानातून वगळून देशाला 'भारत' हे एकमेव नाव देण्यासाठीच केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान बोलावल्याची शक्यता काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी मंगळवारी व्यक्त केली. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्वीटरवरुन भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरही 'इंडिया'ऐवजी 'भारत' नाव असावं आणि याच नावाच्या जर्सी घालून संघाने पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळावं अशी इच्छा व्यक्त केली. याच विधानावरुन सेहवागवर विरोधकांनी तसेच काँग्रेस समर्थकांनी टीकेची झोड उठवली आहे. अनेक ट्रोलर्सने सेहवागला भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळणार की काय म्हणत त्याला ट्रोलही केलं आहे. असं असतानाच आता सेहवागने थेट एका जुन्या बातमीचा फोटो शेअर करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख असलेल्या बातमीमध्ये 'इंडिया'ला 'भारत' नावाने ओळखलं जाणार या मथळ्याखालील बातमी छापलेली इमेज सेहवागने शेअर केली आहे. हा फोटो शेअर करत सेहवागने टीकाकांना उत्तर दिलं आहे. "आपल्या देशाला भारत नावाने ओळखलं जावं असं मत मांडण्याकडे राजकीय अर्थाने पाहिलं जातं हे फार मजेशीर वाटतं," असं सेहवागने म्हटलं आहे.
"मी कोणत्याही ठराविक राजकीय पक्षाचा चाहता नाही. आपल्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये चांगले लोक आहेत. तसेच दोन्ही पक्षांमध्ये अपात्र लोकही आहेत. मी पुन्हा एकदा उल्लेख करु इच्छितो की माझे कधीही कोणतेही राजकीय हेतू नव्हते किंवा या पुढेही असणार नाहीत. माझी तशी इच्छा असती तर मी मागील 2 लोकसभा निवडणुकींमध्ये दोन्ही पक्षांकडून आलेली ऑफर स्वीकारली असती. तसेच माझ्या काही राजकीय इच्छा असल्या तर माझी मैदानातील कामगिरी पुरेशी आहे की मला कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळू शकतं. मनातलं बोलणं हे राजकारणाहून फार वेगळी गोष्ट आहे. माला केवळ 'भारता'मध्ये रस आहे," असंही सेहवागने स्पष्ट केलं आहे.
"विरोधक स्वत:ला INDIA म्हणवतात त्याप्रमाणे ते स्वत:ला B.H.A.R.A.T ही म्हणवून घेऊ शकतात. असे अनेक क्रिएटीव्ह लोक आहेत जे या नावासाठी काहीतरी योग्य फुलफॉर्म सुचवू शकतात. काँग्रेसने तर भारत जोडो यात्रा नावाने यात्राही आयोजित केली होती. अनेकांना भारत या नावामुळे असुरक्षित वाटतंय. माझ्या मते विरोधकांच्या आघाडीचं नाव काय आहे हे बाजूला ठेवलं तरी निवडणूक मोदी विरुद्ध विरोधक अशीच होणार आहे. जे सर्वोत्तम आहेत त्यांना विजय मिळो," असं सेहवागने म्हटलं आहे.
Funny when people think having a desire that our nation be addressed as Bharat is viewed as a political thing.
I am no fan of any particular political party. There are good people in both national parties and there are also very many incompetent people in both parties. I once… pic.twitter.com/9aJoJ6FEGp— Virender Sehwag (@virendersehwag) September 6, 2023
"मला केवळ यामधून फार आनंद होईल आणि समाधन वाटेल जेव्हा आपल्या देशाला 'भारत' नावाने ओळखलं जाईल," असं सेहवागने ट्वीटच्या शेवटी म्हटलं आहे.