IND vs NZ: न्यूझीलंडला 'इतिहास' घडवायला लागली ९० वर्ष

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा १० विकेटने दणदणीत विजय झाला आहे.

Updated: Feb 24, 2020, 06:55 PM IST
IND vs NZ: न्यूझीलंडला 'इतिहास' घडवायला लागली ९० वर्ष title=

वेलिंग्टन : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा १० विकेटने दणदणीत विजय झाला आहे. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आङे. न्यूझीलंडचा टेस्ट क्रिकेटमधला हा १००वा विजय आहे. टेस्टमध्ये १०० विजयांचा टप्पा गाठण्यासाठी न्यूझीलंडला ९० वर्ष लागली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरी टेस्ट मॅच २९ फेब्रुवारीपासून क्राईस्टचर्चमध्ये सुरू होईल.

न्यूझीलंड १०० टेस्ट जिंकणारी ७वी टीम बनली आहे. न्यूझीलंडने १९३० साली टेस्ट क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून न्यूझीलंडने एकूण ४४१ टेस्ट मॅच खेळल्या. यातल्या १७५ टेस्टमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला. उरलेल्या १६६ मॅच ड्रॉ झाल्या. न्यूझीलंडसोडून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत या देशांनी १०० टेस्ट मॅच जिंकल्या आहेत.

सर्वाधिक चेस्ट मॅच जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने ८३० पैकी ३९३ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. तर इंग्लंड ३७१ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशिवाय इतर कोणत्याही टीमला २०० पेक्षा जास्त टेस्ट मॅच जिंकता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाने १९५१ साली १००वी टेस्ट मॅच जिंकली होती. हे करणारी ऑस्ट्रेलिया पहिली टीम ठरली होती. ऑस्ट्रेलियाला १०० टेस्ट मॅच जिंकण्यासाठी ७४ वर्ष लागली होती.

भारताने ५४१ टेस्ट मॅचपैकी १५७ टेस्ट मॅच जिंकल्या. सर्वाधिक टेस्ट मॅच जिंकण्याच्याबाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशिवाय वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेने भारतापेक्षा जास्त टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिजने १७४ आणि दक्षिण आफ्रिकेने १६५ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. पाकिस्तानला १३८ टेस्ट मॅच जिंकता आल्या आहेत. सर्वाधिक टेस्ट मॅच विजय मिळवणाऱ्या टीममध्ये पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंडने या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर १६५ रनमध्येच भारताचा ऑल आऊट झाला. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये ३४८ रन केल्यामुळे त्यांना १८३ रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने १९१ रनच केल्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी फक्त ९ रनचं आव्हान मिळालं. न्यूझीलंडने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.