Olympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा Video

Arshad Nadeem Meet Terrorist: नदीमला भेटण्यासाठी अनेकजण त्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील छोट्याश्या गावातील घरी येत असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 14, 2024, 01:19 PM IST
Olympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा Video title=
त्यांच्या भेटीचा व्हिडीओ चर्चेत

Arshad Nadeem Meet Lashkar Terrorist: पाकिस्तानला 32 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करुन देणारा भालाफेकपटू अर्शद नदीम सध्या चांगलाच चर्चेत आहे. ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत पदक जिंकल्यानंतर मायदेशी परतल्यापासून नदीमवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अनेकजण या 27 वर्षीय खेळाडूला भेटण्यासाठी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील घरी येत आहेत. असं असतानाच चक्क एका दहशतवाद्याने नदीमची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विश्वविक्रमी कामगिरी

नदीमने ऑलिम्पिकमध्ये 92.97 मीटरपर्यंत भाला फेकत विश्वविक्रमी कामगरीच्या माध्यमातून पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. नदीमने भारताच्या नीरज चोप्रापेक्षा सरस कामगिरी केल्याने यंदा नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. नीरज सुवर्ण पदक जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नदीमपेक्षा उत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकलं होतं. यंदा मात्र नदीमने बाजी मारली. नीरजचा भाला यंदाच्या फायनलमध्ये 89.35 मीटरपर्यंतच जाऊ शकला. सामन्यानंतर दोघांनी एकमेकांचं अभिनंदन करत आदर व्यक्त केला. 

बक्षिसांचा पाऊस

नदीम पाकिस्तानात परतल्यानंतर लाहोर विमानतळापासूनच त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. सरकारकडून त्याची विजय यात्राही काढण्यात आली. नदीमला पाकिस्तानमधील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक दिला जाईल अशी चर्चा आहे. त्याला सोन्याचं मुकूट आणि लाखो पाकिस्तानी रुपये बक्षिस म्हणून दिले जाणार आहेत. जगभरातील पाकिस्तानी लोकांबरोबरच नदीम राहत असलेल्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला खास 92.97 अशी नंबर प्लेट असलेली कार बक्षिस म्हणून भेट दिली आहे.

दहशतवाबरोबर नदीमची भेट; व्हिडीओ व्हायरल

एकीकडे त्याच्यावर हा बक्षिसांचा वर्षाव सुरु असतानाच नदीमची भेट घेण्यासाठी आलेली एक व्यक्ती पाहून जगभरामध्ये खळबळ उडाली आहे. संयुक्त राष्ट्राने लष्कर-ए-तोयबाचा नेता हरिस धार याला दहशतवादी घोषित केलं आहे. असं असतानाच नदीमचं अभिनंदन करण्यासाठी त्याने नदीमची भेट घेतल्याचं पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दोघांमध्ये ज्या विषयावर चर्चा चालल्या आहेत त्यावरुन हा व्हिडीओ नदीम ऑलिम्पिकमधून पाकिस्तानात परतल्यानंतरचा असल्याचं सांगितलं जात आहे. या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 

मुंबई हल्ल्यामध्ये हीच दहशतवादी संघटना

अशाप्रकारे नदीमची भेट घेऊन त्याचं अभिनंदन करण्यामागे अधिक अधिक तरुणांना लष्कर-ए-तोयबाकडे आकर्षित करण्याचा या दहशतवादी संघटनेचा डाव असल्याचं सांगितलं जात आहे. लष्कर-ए-तोयबा भारताविरुद्धच्या अनेक कारवायांमध्ये सहभागी असलेली दहशतवादी संघटना आहे. जम्मू-काश्मीरबरोबरच अनेक हल्ल्यामध्ये या दहशतवादी संघटनेचा सहभाग आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यामगेही हीच संघटना होती. 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान लष्कर-ए-तोयबाने केलेल्या या दहशतवादी हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 जणांनी प्राण गमावले होते. 800 हून अधिक लोक या हल्ल्यात जखमी झालेले.