ऑस्ट्रेलियाच्या आरोपांवर भडकले पाकिस्तानचे दिग्गज

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं आहे.

Updated: Apr 1, 2018, 07:58 PM IST
ऑस्ट्रेलियाच्या आरोपांवर भडकले पाकिस्तानचे दिग्गज

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर कॅमरून बँक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली आहे.

बॉलशी केलेल्या छेडछाडीनंतर ऑस्ट्रेलियामधूनच त्यांच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे. रिव्हर्स स्विंगसाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बेईमानी केल्याची भावना ऑस्ट्रेलियातल्या क्रिकेट फॅन्सनी बोलून दाखवल्या आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट फॅन्सच्या या आरोपांवर पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू मात्र चांगलेच भडकले आहेत.

पाकिस्तानचे बॉलर रिव्हर्स स्विंगचे बादशाह

रिव्हर्स स्विंगमध्ये पाकिस्तानचे बॉलर बादशाह असल्याचं नेहमीच बोललं जातं. रिव्हर्स स्विंगसाठी पाकिस्तानच्या इम्रान खान, वकार युनुस, वसीम अक्रम, शोएब अख्तरनं बॉलशी छेडछाड केल्याचे आरोप नेहमीच होत आले आहेत. 

रिव्हर्स स्विंग एक कला

बॉलशी छेडछाड न करताही रिव्हर्स स्विंग करता येतो. रिव्हर्स स्विंग ही एक कला आहे. रिव्हर्स स्विंगच्या मागे एक विज्ञान आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर सरफराज नवाज यांनी दिली आहे. सरफराज यांनी ५५ टेस्टमध्ये १७७ विकेट घेतल्या आहेत.

'आम्ही करतो तेव्हा चिटींग'

रिव्हर्स स्विंगची कला मी इमरानला शिकवली आणि इमराननं वसीम अक्रम आणि वकार युनुसला. त्यावेळी रिव्हर्स स्विंगला सगळे जण चिटींग म्हणायचे. पण जेव्हा इंग्लिश खेळाडू रिव्हर्स स्विंग करायला लागले, तेव्हा त्याला कला म्हणलं गेलं, अशी टीकाही सरफराज नवाज यांनी केली.

ऑस्ट्रेलियानं केलेलं चिटींग

रिव्हर्स स्विंग एक कला आहे. बॉल छेडछाड यापेक्षा वेगळी आहे. बॉलशी छेडछाड ही चिटींगच असल्याचा दावा सरफराज नवाज यांनी केला आहे. स्मिथ-वॉर्नरवर घालण्यात आलेल्या बंदीचंही नवाज यांनी समर्थन केलं आहे.