शाहीनने खांद्यावरून हात का झटकला? कॅप्टन शान मसूदने सांगितलं सत्य, म्हणाला 'राग आला नव्हता पण...'

Shan Masood Shaheen Afridi fight : पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि कॅप्टन शान मसूद यांच्या व्हायरल व्हिडीओवर मोठा खुलासा झालाय.

सौरभ तळेकर | Updated: Sep 4, 2024, 07:02 PM IST
शाहीनने खांद्यावरून हात का झटकला? कॅप्टन शान मसूदने सांगितलं सत्य, म्हणाला 'राग आला नव्हता पण...'  title=
Shan Masood Shaheen Afridi fight

Shan Masood On Alleged Rift With Shaheen Afridi : पाकिस्तान क्रिकेट सध्या चर्चेत आलीये ती खेळामुळे नाही तर वादामुळे.. पाकिस्तानला बांगलादेश क्रिकेट संघाकडून मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. पाहुण्या बांगलादेश संघाने यजमान पाकिस्तानला 2-0 ने कसोटी मालिकेत पराभव करून क्रिडाविश्वात नाचक्की केली होती. तर पाकिस्तान संघातील वाद देखील उफाळून आला होता. ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार शान मसूद (Shan Masood) आणि जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) यांच्यात राडा झाल्याचं वृत्त समोर समोर आलं होतं. तर शाहीनने कॅप्टन मसूदचा खांद्यावरून हात झटकल्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यावर कॅप्टन शानने खुलासा केलाय.

लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी शानला पत्रकारांच्या बाऊन्सरला सामोरं जावं लागलं. त्यावेळी शानने शाहीनसोबतच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर शान मसूद आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात वाद झाल्यासंबंधी वेगवेगळे दावे केले जात असतानाच आता शानने असा कोणताही वाद नसल्याचं जाहीर केलंय. 

काय म्हणाला शान मसूद?

मला वाटतं सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी शाहीनच्या खांद्यावर हात ठेवला अन् शाहीनने माझा हाच झटकला. पण खरं तर शाहीन रागात नव्हता, त्याने मुद्दामहून असं केलं नाही, तर त्याला खांद्याची दुखापत होती आणि त्याचा खांदा दुखत होता, असं शान मसूदने सांगितलं. टेस्ट क्रिकेटमध्ये तुमचा फिटनेस महत्त्वाचा असतो. मानसिकदृष्ट्या आणि शारिरीकदृष्ट्या फिट राहणं महत्त्वाचं असतं. मला वाटतं की आम्हाला यावर काम करण्याची गरज आहे, असंही शानने यावेळी बोलून दाखवलं.

मी पराभवाची जबाबदारी घेतो आणि पाकिस्तानच्या जनतेची माफी मागतो. आता कसोटी संघाला कसं पुढे नेऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. जवळपास 10 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेट खेळणं सोपं काम नव्हतं. खेळाडू चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरले, असं म्हणत शानने नाराजी देखील बोलून दाखवली. 

दरम्यान, आम्हाला वेगवान गोलंदाजांची संख्या वाढवण्याची गरज आहे. जे गोलंदाज नियमितपणे रेड बॉल क्रिकेट खेळतात त्यांना प्रोत्साहन आणि संधी देण्याची गरज असल्याचं देखील शान मसूदने बोलून दाखवलंय.