मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!

Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: Aug 13, 2024, 07:19 PM IST
मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा! title=
Arshad Nadeem gifted brand new Honda Civic car

Arshad Nadeem gifted Honda Civic car : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात भारताच्या नीरज चोप्रा याने सिल्वर मेडल जिंकलं अन् पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने गोल्ड मेडल पटकावलं. ऑलिम्पिकच्या फायनल सामन्यात अर्शद नदीमने सर्वोत्तम कामगिरी केली. दुसऱ्या थ्रोमध्ये नदीमने तब्बल  92.97 मीटर भाला फेकला आणि ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचला. नदीमच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानला तब्बल 32 वर्षांनंतर पदक तर 40 वर्षांनंतर सुवर्ण पदक मिळालं आहे. अशातच पाकिस्तानमध्ये नव्या स्टारचं जंगी स्वागत करण्यात आलं अन् बक्षिसांचा पाऊस देखील नदीमवर पडताना दिसतोय. अशातच अर्शद नदीमला एक खास गिफ्ट मिळालंय.

पाकिस्तानमधील अनेक उद्योगपती, नेत्यांनी अर्शद नदीमला बक्षीसं जाहीर केली आहेत. यात काही विचित्र बक्षीसही मिळत आहेत, ज्यामध्ये अर्शदच्या सासऱ्याने त्याला चक्क म्हैस गिफ्ट केलीये. तर अतरंगी भेटवस्तू देखील अर्शदला मिळताना दिसतायेत. अशातच आता पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांनी अर्शदची घरी जाऊन भेट घेतली अन् त्याला गिफ्ट दिलं. मरियमने अर्शदच्या घरी जाऊन त्याचं कौतूक केलं. त्यावेळी गिफ्ट म्हणून आलिशान होंडा सिविक कार त्याला दिली. पण चर्चा सुरू गाडीच्या नंबर प्लेटची..!

मरियम नवाज शरीफ यांनी भेट म्हणून दिलेल्या गाडीची नंबर प्लेट फार युनिक ठरली. PAK 92.97 अशी गाडीची नंबर प्लेट होती. अर्शदने 92.97 मीटर भाला फेकून रेकॉर्ड रचला होता. याचीच आठवण म्हणून त्याला अनोखी नंबर प्लेट देखील मिळाली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या गोल्ड मेडल पेक्षा या नंबर प्लेटची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अली फाऊंडेशनच्या माध्यमातून मी त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतोय, असं अभिनेता आणि गायक अली जफर याने म्हटलं होतं. तर पाकिस्तानचे उद्योगपती अली शेखानी यांनी अर्शद नदीमला ऑल्टो कार गिफ्ट केली. पण पाकिस्तानातली सर्वात स्वस्त कार  गिफ्ट केल्याने आता उद्योगपती अली शेखानी ट्रोल होताना दिसतायेत. अर्शद नदीला आतापर्यंत 150 मिलिअन पाकिस्तान रुपयांची बक्षिसं मिळाली आहे. भारतीय रुपयात ही रक्कम 4.50 कोटी होईल. याशिवाय सिंध प्रांताचे राज्यपाल सरदार सलीम हैदर खान यांनी नदीमला 2 मिलिअन पाकिस्तानी रुपयांची घोषणा केलीय. नदीमला पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने देखील सन्मानित केलं जाणार आहे.