'जेव्हा तुम्ही भारताविरोधात पराभूत होता...,' अहमद शेजाद पाकिस्तान संघावर संतापला, 'मी आयुष्यात इतकी वाईट...'

रावळपिंडीमधील कसोटी सामन्यात बांगलादेशने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर स्टार फलंदाज अहमद शेजादने संघावर ताशेरे ओढत संताप व्यक्त केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 26, 2024, 05:42 PM IST
'जेव्हा तुम्ही भारताविरोधात पराभूत होता...,' अहमद शेजाद पाकिस्तान संघावर संतापला, 'मी आयुष्यात इतकी वाईट...' title=

पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज अहमद शेजाद संघावर टीका करताना अजिबात मागे पुढे पाहत नाही. मग त्याला संघातून वगळण्याचा विषय असो किंवा इतर विषय असो अहमद शेजार स्पष्टपणे आपलं मत मांडत असतो. त्यातच रावळपिंडीमधील कसोटी सामन्यात बांगलादेशने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर अहमद शेजादने संघावर ताशेरे ओढत संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान संघाला पहिल्यांदाच बांगलादेशकडून लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

"मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधीही पाकिस्तान संघाची इतकी दुरावस्था झालेली पाहिलेली नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हा तर वेगळाच विषय आहे. पण पाकिस्तान संघ सध्या अत्यंत वाईट स्थितीत आहे. या पराभवातून सावरणं आता त्यांना फार कठीण जाणार आहे. अफगाणिस्तानविरोधातील पराभवानंतर अद्यापही ते सावरलेले नाहीत," असं शेहजादने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघ आता हॉकी संघाप्रमाणे गडद अंधारात जात आहे असंही तो म्हणाला आहे. यासाठी खेळाडूंपेक्षा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जास्त जबाबदार असल्याचं त्याने सांगितलं आहे. तो म्हणाला की, "मी याआधीही हे म्हटलं आहे. पाकिस्तान संघ आधीच अंधाराच्या दिशेने निघाला आहे. त्यामुळे तुम्ही आता अल्पकालीन निर्णय घेऊ शकत नाही. ही परिस्थिती हॉकीप्रमाणे आहे. पाकिस्तान बांगलादेशविरोधात हारणार नाही अशी अपेक्षा होती, पण आता त्यांनी तेदेखील केलं आहे. पाकिस्तान खेळाडूंची चूक नाही. क्रिकेट बोर्ड यासाठी जबाबदार आहे".

"खेळाडू कधीच एखाद्याला संघात घेण्यासाठी दबाव टाकत नाहीत. बोर्डच त्यांना खेळवत असतं आणि स्थानिक खेळाडूंना खेळण्याची संधी देत नाही. जर तुमच्याकडे खेळवण्यासाठी स्थानिक खेळाडू नसतील तर मग तुम्ही काय करत होतात?," अशी विचारणा त्याने केली आहे.
 
शेहजादने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, डर्टी जोक खेळण्यात आला आहे, पण अद्यापही कोणाचा  गळा पकडायचा हे स्पष्ट झालेलं नाही. "पाकिस्तान संघाच्या ऐतिहासिक पतनाला सुरुवात झाली आहे. देशाला वारंवार खोटं सांगितलं जात आहे आणि आज बांगलादेशकडून झालेल्या ऐतिहासिक मानहानीकारक पराभवानंतर पुन्हा हा घाणेरडा विनोद खेळला गेला आहे. राष्ट्राने कोणाकडे जाब मागायचा? गळा पकडण्यासाठी या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण?," असं शेहजादने म्हटलं आहे. 

शेहजादने पीसीबी चेअरमन मोहसीन नकवी यांच्यावरही थेट आरोप केले आहेत. "टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरोधातील पराभवानंतर तुम्ही पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल करणार असं सांगितलं होतं. पण तुम्ही अपयशी ठरलात. तुम्ही आधीप्रमाणे पुन्हा एकदा खोटं बोललात. तुम्हाला काय वाटत आहे? यामुळे वेळ वाढवून मिळेल? कसोटी मालिकेत बांगलादेशचा पराभव केल्यानंतर लोक शांत होतील आणि नंतर तुम्ही बदल कराल असा विचार केला होता 
का? पण तसं झालं नाही," असं शेहजाद म्हणाला.

"तुम्ही वेळेत बदल केले नाहीत तर असेच घडते. तुम्ही घाबरलात आणि तुम्ही निर्णय घेतला नाही. मला सांगण्यात आले होते की मोहसीन नक्वी पीसीबीचे प्रमुख झाल्यानंतर ते धाडसी, दृढनिश्चयी आणि चतुर माणूस आहे. जर कोणी पीसीबी बदलू शकत असेल तर ते नक्वी असेल असं बोलण्यात आलं. परंतु आम्ही अद्याप ते पाहिले नाही. परंतु त्यांनी आतापर्यंत जे काही केलं आहे, यावरून हे स्पष्ट होते की मोहसीन नक्वी यांना क्रिकेटची अजिबात कल्पना नाही," असा संताप शेहजादने व्यक्त केला आहे.