मनु भाकेरचा भाव वधारला! पदक जिंकताच फी वाढवली, आता 20 लाखाहून थेट...; 40 ब्रँड्सकडून जाहिरातीसाठी संपर्क

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) कांस्यपदक (Bronze Medal) जिंकताच मनु भाकेरकडे (Manu Bhaker) जाहिरातींसाठी रांग लागली आहे. 40 ब्रँड्सनी तिच्याकडे जाहिरातीसाठी संपर्क साधला आहे. तिनेही यानंतर आपल्या मानधनात वाढ केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 2, 2024, 07:10 PM IST
मनु भाकेरचा भाव वधारला! पदक जिंकताच फी वाढवली, आता 20 लाखाहून थेट...; 40 ब्रँड्सकडून जाहिरातीसाठी संपर्क title=

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकेरने दोन पदकं जिंकत नवा इतिहास रचला आहे. मनु भाकेरने आधी 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक पदक जिंकलं. यानंतर मिश्र दुहेरीतही कांस्यपदक जिंकत नवा रेकॉर्ड रचला. यामुळे मनु भाकेर हे प्रत्येकाच्या तोंडी आलं असून, तिला प्रसिद्धी मिळाली आहे. त्यातच आता 50 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेतही मनु भाकेर पदक जिंकण्याची शक्यता असून असं झाल्यास ही हॅटट्रीक असेल. दरम्यान ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे मनू भाकेरच्या मागे आता ब्रँण्डची रांग लागली आहे. मनु भाकेरला तब्बल 40 ब्रँड्सनी जाहिरातीसाठी विचारणा केली आहे. सध्या मनु भाकेरचं सर्व लक्ष पॅरिस ऑलिम्पिककडे आहे. मात्र यादरम्यान तिच्या एजन्सीने करोडोंच्या काही डिल्स सील केल्या आहेत.

मनु याआधी जाहिरातीसाठी प्रत्येकी 20 ते 25 लाख मानधन आकारत होती. पण आता त्यात बदल झाला असून तिने मानधनात 6 ते 7 पटीने वाढ केली आहे. आता ती प्रत्येक जाहिरातीसाठी जवळपास 1 कोटी 60 लाख रुपये घेत आहे. 

"गेल्या 2-3 दिवसात आमच्याकडे सुमारे 40 कंपन्यांनी चौकशी केली आहे. आम्ही सध्या दीर्घकालीन टीकणाऱ्या डीलवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आम्ही काही जाहिरातींसाठी होकार दिला आहे," असे IOS स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटचे सीईओ आणि एमडी नीरव तोमर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं. ही कंपनी मनूचं व्यवस्थापन सांभाळते.

"तिची ब्रँड व्हॅल्यू अर्थातच पाच ते सहा पटींनी वाढली आहे. त्यामुळे आम्ही आधी जे काही करत होतो ते 20-25 लाखांच्या आसपास होते, आता एका जाहिरातीसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये आकारले जात आहेत. विशिष्टतेसह ब्रँड श्रेणीसाठी ही एक वर्षाची प्रतिबद्धता आहे," असंही त्यांनी सांगितलं. 

मनूच्या टीमसाठी दीर्घकालीन जााहिराती प्राथमिक लक्ष असताना काही अल्प-मुदतीच्या जाहिरातीही स्विकारण्यात आल्या आहेत. "1 महिना, 3 महिने अशा अल्पकाळासाठी अनेक डिजिटल जाहिरातींची चौकशी आली आहे. परंतु आम्ही दीर्घकालीन डिल्सवर लक्ष केंद्रित करत आहोत," असं ते पुढे म्हणाले.

"एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये आम्हाला नेमबाजीत बरीच पदके मिळतात. पण नंतर त्याचं फारसं कौतुक होत नाही. ऑलिम्पिकमध्ये मात्र तुम्ही लक्ष वेधून घेता. दोन पदकांसह तुम्ही वेगळी ओळख निर्माण करता," असंही त्यांनी सांगितलं.