Shahid Afridi On Babar Azam Resign : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) आणि पाकिस्तान किक्रेट बोर्ड (PCB) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. नुकतंच बाबर आझमने पाकिस्तानचे सर्व फॉरमॅटमधील कॅप्टन्सी सोडली अन् पाकिस्तानमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. बाबरने राजीनामा दिल्यानंतर पीसीबीने शाहीन शाह आफ्रिदीला (Shaheen Shah Afridi) टी-20 आणि शान मसूदला कसोटी फॉरमॅटची जबाबदारी दिली आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि शाहीन आफ्रिदीचा सासरा शाहिद आफ्रिदीने आता बाबर आझमच्या कर्णधारपदाबाबतचा खुलासा केला आहे.
एवढ्या लवकर कर्णधार बदलण्याची गरज नाही. पंतप्रधान आणि मी बोलत होतो. पंतप्रधानांनी मला बाबरविषयी विचारलं. आता कर्णधार बदलण्याची गरज नाही, असं स्पष्ट मत मी मांडलं. मला वाटतं की, त्याने कसोटी क्रिकेटमधील जबाबदारी सांभाळावी. जर तुम्ही वनडे क्रिकेटबाबत विचाराल तर मला वाटतं की मोहम्मद रिझवान हा खरा उमेदवार असावा, असं म्हणच शाहिद आफ्रिदीने जावईच्या करियरवर कुऱ्हाड मारली आहे.
माझं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमनशी बोलणं झालंय. मी त्यांना सांगितलंय की कसोटी क्रिकेटमध्ये बाबरच पाकिस्तानचा कर्णधार असावा, पण वनडे आणि टी-ट्वेंटीमध्ये मोहम्मद रिझवानच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात यावी. त्याने मुलतानसाठी कॅप्टन्सी केली आहे आणि सर्व खेळाडूंना सोबत घेऊन कसं पुढं जायचं हे त्याला चांगलंच माहितीये. मी म्हणेन की अध्यक्षांसह मोहम्मद हाफीजचा हा निर्णय आहे, असंही शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे.
शाहीनच्या टी-ट्वेंन्टी कर्णधार बनण्याच्या बाबतीत, मला अशा कोणत्याही निर्णयांमध्ये अडकायचं नव्हतं. कारण मला माहित आहे की, त्याचे माझ्याशी असलेलं नातं लक्षात घेऊन, लोक म्हणतील की मी शाईनसाठी लॉबिंग करतोय. मला या गोष्टींमध्ये अडकायचं नाही. तसं असतं तर मी अध्यक्षांवर टीका केली नसती. मी खात्रीनं सांगतो की आजपर्यंत मी शाहीनला कर्णधारपदासाठी कधीही पाठीशी घातलेलं नाही, असं म्हणत शाहिदने आपली बाजू स्पष्ट केली.
“Making Shaheen a captain is entirely Hafeez’s and the PCB chairman’s decision. I have nothing to do with that. I was against it even when he took over Lahore’s captaincy. I told the Chairman not to remove Babar yet. Even if you do, make Rizwan a captain then”, @SAfridiOfficial pic.twitter.com/efL4TqdVlw
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 16, 2023
दरम्यान, आत्तापर्यंतच्या प्रवासात अतुलनीय पाठिंबा दिल्याबद्दल मी उत्कट पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. आज, मी सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा एक कठीण निर्णय आहे, पण मला वाटते की हीच वेळ आहे, असं म्हणत बाबर आझमने कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता.