पुलवामा हल्ला : 'खेळ आणि राजकारण वेगळं ठेवा'; पीसीबीचे उपदेशाचे डोस

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

Updated: Feb 18, 2019, 02:24 PM IST
पुलवामा हल्ला : 'खेळ आणि राजकारण वेगळं ठेवा'; पीसीबीचे उपदेशाचे डोस title=

इस्लामाबाद : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ऐतिहासिक ओळख असलेल्या मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया(सीसीआय) मधून पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो हटवण्यात आला. याचबरोबर मोहालीच्या स्टेडियममधूनही १५ पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवण्यात आले. राजस्थान क्रिकेट असोसिएशननंही अशीच कारवाई केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मात्र त्यांच्या खेळाडूंचे फोटो हटवल्याप्रकरणी भारतालाच उपदेशाचे डोस पाजायला सुरुवात केली आहे.

पाकिस्तान क्रिकेच बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान म्हणाले, 'खेळ आणि राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं. दोन्ही देशांमधली दरी कमी व्हायला क्रिकेटनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो एका ऐतिहासिक क्रिकेट क्लबवरून हटवणं खेदजनक आहे.'

पुलवामामध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सुपर लीगलाही याचा फटका बसला आहे. पाकिस्तान सुपर लीगचं प्रक्षेपण करणाऱ्या आयएमजी रिलायन्सनं मॅचचं प्रक्षेपण दाखवायला नकार दिला आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून आयएमजी रिलायन्सनं हे पाऊल उचललं आहे.

'आयएमजी रिलायन्सनं आम्ही पीएसएल २०१९चं प्रक्षेपण करणार नाही, याची माहिती आम्हाला दिली आहे. पीसीबीकडे याबद्दलची दुसरी योजना तयार आहे', असं वसीम खान यांनी सांगितलं. 

मोहालीतून पाकिस्तानी क्रिकेटपटू आऊट

मोहालीच्या स्टेडियममधल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाकिस्तानच्या १५ खेळाडूंचे फोटो होते. गॅलरी, लॉन्ग रूम, रिसेप्शन आणि हॉल ऑफ फेम, या भागांमध्ये आम्ही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो लावले होते. हे फोटो आता हटवण्यात आले आहेत. मोहालीच्या स्टेडियममध्ये इम्रान खान, वसीम अक्रम, शाहिद आप्रिदी, जावेद मियांदाद यांचे फोटो होते. 

राजस्थान क्रिकेट असोसिएशननेही असाच एक महत्त्वाची निर्णय घेतला आहे. सवाई मानसिंग स्टेडियममध्ये फोटो दालनात लावण्यात आलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो हटवण्यात आले आहेत. पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच शुक्रवारीच १६ फेब्रुवारीला हे फोटो हटवण्यात आले.