भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला कोणत्याही ओळखीची गरज नाही. पी व्ही सिंधूने अनेक स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यामध्ये दोन ऑलिम्पिक पदके, एक जागतिक चॅम्पियनशिप सुवर्णपदक याशिवाय आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांमधील पदकांचा समावेश आहे. पी व्ही सिंधू सध्या 28 वर्षांची असून, तिला करिअरचा मोठा टप्पा गाठायचा आहे. सध्या तिच्यासमोर 2024 पॅरिस ऑलिम्पिकचं ध्येय आहे, दरम्यान या स्पर्धेसाठी तिने बॅडमिंटन दिग्गज प्रकाश पादुकोण यांच्यासह 'मेंटॉर' म्हणून तयारी सुरु केली आहे. पीव्ही सिंधूला मागील काही स्पर्धांमध्ये संघर्ष करावा लागला असून, आपण कमबॅक करु असा तिला विश्वास आहे.
युट्यूब चॅनेल टीआरएस क्लिप्सने पॉडकास्टचा व्हिडीओ अपलोड केला आहे. यादरम्यान पीव्ही सिंधूला तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. तुझं सध्या रिलेशनशिप स्टेटस काय आहे असा प्रश्न विचारण्यात आलं तेव्हा तिने आपण अद्याप 'सिंगल' असल्याचं म्हटलं. 'सध्या माझ्यासाठी फक्त बॅडमिंटन महत्त्वाचं आहे. ऑलिम्पिक हेच माझं ध्येय आहे,' असंही तिने स्पष्ट केलं.
'पण तुला आपला जोडीदार असावा असं वाटत असेल ना', असं पुन्हा तिला विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली 'मी याबद्दल फार विचार केलेला नाही. पण मला नक्कीच जोडीदार हवा आहे. जे माझ्या नशिबात लिहिलं असेल ते मिळेल', असं पीव्ही सिंधूने सांगितलं.
यावेळी तिला पुन्हा एकदा त्याचसंबंधी विचारण्यात आलं की, 'तू कधी कोणाला डेट केलं आहेस का?'. त्यावर तिने उत्तर दिलं की, "नाही, खरंच नाही. याबद्दल चांगलं किंवा वाईट असं काहीच नाही. आयुष्य असंच पुढे जातं. जर ते होणार असेल तर काही करुन होईल".
दरम्यान सध्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत असलेली पीव्ही सिंधू सध्या आपला बेस हैदराबाद येथून बंगळुरुला हलवणार आहे. प्रकाश पादुकोण पी व्ही सिंधूला प्रशिक्षण देणार आहेत.
पीव्ही सिंधूने सप्टेंबर महिन्यात प्रकाश पादुकोण यांच्या अंतर्गत आठवडाभर प्रशिक्षण घेतलं होतं. एशियन गेम्सच्या आधी तिने आपण प्रकाश पादुकोण यांच्याकडून प्रशिक्षण घेणार असल्याचे सूतोवाचही दिले होते. अखेर तिने सोशल मीडियाद्वारे याचा खुलासा केला होता. "जे मला सतत विचारणा करत होत, त्यांच्यासाठी अखेर सत्य समोर आलं आहे," अशी पोस्ट तिने सोशल मीडियावरुन शेअर केली होती.
"प्रकाश सर माझ्या मेंटॉरची भूमिका निभावत आहेत. मी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस त्यांच्यासबोत प्रशिक्षण सुरु केलं होतं. तेव्हापासून तो प्रवास कायम आहे," असं पीव्ही सिंधूने लिहिलं होतं. "ते माझ्यासाठी फक्त मेंटॉर नाहीत, तर माझे मार्गदर्शक, गुरु आणि त्याहूनही वरती खरे मित्र आहेत. माझ्यातील सर्वोत्कृष्ट बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडे एक जादू आहे असं मला वाटतं," असंही तिने म्हटलं आहे.
"मी जपानमध्ये असताना फक्त एका फोनवर ते उपलब्ध झाले होते. त्यानंतर आमच्यातील नातं अधिकच दृढ झालं आहे. प्रिय सर, तुमच्यासोबत प्रशिक्षणासाठी मी उत्सुक आहे! चला कामाला लागूयात, " असं मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या नेतृत्वाखाली रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने लिहिलं आहे.