मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडवर नवी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रीय अकादमीच्या प्रमुखपदी राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने याची घोषणा केली आहे. १ जुलैपासून राहुल द्रविड हे पद स्वीकारणार होता, पण द्रविड सध्या इंडिया सिमेंट्समध्ये नोकरी करत असल्यामुळे, त्याला या पदावर यायला उशीर होणार आहे.
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने राहुल द्रविडला इंडिया सिमेंट्सचं उपाध्यक्ष पद सोडावं किंवा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख असेपर्यंत उपाध्यक्षपदावर राहू नये, अशी विनंती केली होती. यानंतर इंडिया सिमेंट्सने राहुल द्रविडला सुट्टीवर पाठवलं.
'राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटशी संबंधित सगळ्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. यामध्ये उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सल्ला देणं, त्यांना प्रशिक्षण देणं, तसंच प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचंनाही प्रशिक्षण देण्याचं काम द्रविड करेल,' असं बीसीसीआयने सांगितलं.
याचबरोबर राहुल द्रविड पुरुष आणि महिला टीमचे मुख्य प्रशिक्षक (भारत ए, भारत अंडर-१९, भारत अंडर-२३) यांच्यासोबत उदयोन्मुख खेळाडूंच्या प्रशिक्षण देणार आहे. याआधी राहुल द्रविड भारताच्या अंडर-१९ टीमचा प्रशिक्षक होता. राहुल द्रविड प्रशिक्षक असताना टीम इंडियाने अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला होता. राहुल द्रविडचा कार्यकाळ किती असणार याबद्दल मात्र बीसीसीआयने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.